कर्जात बुडालेले रिलायन्स उद्योग समूहाचे प्रमुख अनिल अंबानी यांच्यासमोरील अडचणी संपताना दिसत नाहीत. दिवाळखोरीत निघालेली शिपयार्ड कंपनी नवल अँड इंजीनियरिंगला वाचवण्यासाठी त्यांनी केलेले आटोकाट प्रयत्न शेवटी निष्फळ ठरले. ही कंपनी २,७०० कोटींना खरेदी करण्याची बोली निखिल मर्चंट यांच्या हेजल मर्कंटाइल स्वान एनर्जीने लावली आहे. तिला रिलायन्सच्या ९५ टक्के कर्जदार व सावकारांनी मंजुरी दिली आहे. अनिल अंबानींना हा मोठा धक्का मानला जातो.
आर्थिक अडचणीत सापडलेले उद्योगपती अनिल अंबानी यांची रिलायन्स नवल अँड इंजिनिअरिंग कंपनी कर्जाची परतफेड करू शकत नव्हती. त्यामुळे कंपनीला लवादाने ती दिवाळखोर म्हणून घोषित केली. त्यानंतर ती विकत घेणाऱ्या उद्योजकांकडून बोली मागवण्यात आल्या होत्या. त्यात हेजल मर्कंटाईल स्वान एनर्जीने सर्वाधिक म्हणजे २ हजार ७०० कोटींची बोली लावली. त्याला रिलायन्सच्या कर्जदार आणि सावकारांनीही मंजुरी दिली. त्यामुळे ही कंपनी वाचवण्याचे आणि अंबानींचे प्रयत्न निष्फळ ठरले. आता ही कंपनी हेजल मर्कंटाईलच्या मालकीची होणार आहे. दरम्यान, हेजलची बोली अयोग्य म्हणून घोषित करावी, अशा मागणीची याचिका अहमदाबाद न्यायालयात दाखल झाली आहे. त्यावर ३० मार्चला सुनावणी होणार आहे.