रशिया आणि युक्रेनमधील तणाव आता पंधरवडा होईल तरी निवळायची चिन्हे नाहीत. ही बाब या दोन देशांपुरती आता मर्यादित राहिलेली नाही. त्याचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिणाम आता सर्व दूरवर, अनेक घटकांवर दिसू लागले आहेत. जगाच्या नकाशावरील मध्यातील भौगोलिक-राजकीय संघर्ष असाच सुरू राहिला तर हे परिणाम कोरोनानंतरच्या लांबलेल्या पूर्वपदावरील प्रवासासारखेच असतील. मुख्य म्हणजे लॉकडाऊनची दोन वर्षे पूर्ण होण्याआधीच सुरु झालेल्या महागाईत आता अधिक भर पडण्याची चिन्हे आहेत. अनेक वस्तूंच्या किंमती वाढण्यासह विशेषतः खाद्यपदार्थांचे दर आणखी महाग होणार आहेत.
तेल, वायू, खनिज धातू आदींच्या किंमती वेगाने वाढत आहेत. अशा इंधनावर अवलंबित्व असलेल्या भारताकरिता संरक्षण साधनसामुग्रीच्या दिशेनेही विपरित परिणाम सहन करावा लागणार आहे. तसेच स्टील, कोळसा, खनिज तेल, नैसर्गिक वायूही महाग होऊ शकते.
युद्धामुळे रशियाच नव्हे तर युक्रेनमधून भारतात येणा-या वस्तूंबाबतही अनिश्चितता आहे. भारत सूर्यफूलतेल आदी खाद्यतेल मोठ्या प्रमाणात युक्रेनमधून आयात करतो. आधीच भडकलेल्या महागाईमुळे भारतात खाद्य जिन्नसांसाठी अधिक किंमत मोजावी लागू शकते.
महागाईचा दर जानेवारी 2022 मध्ये 5.1 टक्के असा तीन दशकातील सर्वोच्च नोंदला गेला आहे. येत्या महिन्यापासून सुरू होणाऱ्या एप्रिल 2022 पासूनच्या नव्या वर्षातील पहिल्या सहामाहीचा विकास दर 4.5 टक्के राहण्याची धास्ती व्यक्त झाली आहे. तुलनेत चालू आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीवर अधिक परिणाम होऊन कंपन्यांच्या नफा-उत्पन्नाचे प्रमाणही खाली येऊ शकते.