Makar Sankranti 2025 : मकर संक्रांती हा वर्षातील पहिला सर्वात मोठा सण. हा हिंदू धर्मातील प्रमुख सण मानला जातो. सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो, त्यादिवशी हा सण साजरा केला जातो. मात्र, मकर संक्रांती नक्की कधी आहे, यावरून अनेकांचा दरवर्षी गोंधळ उडतो.
हा सण नक्की 13 जानेवारीला आहे की 14 जानेवारीला असा प्रश्न पडतो. यंदा मकर संक्रांती नक्की कधी आहे व या दिवसाला एवढे महत्त्व का आहे? याविषयी जाणून घेऊया.
यंदा मकर संक्रांती (Makar Sankranti) कधी आहे?
यंदा मकर संक्रांतीचा सण 14 जानेवारी 2025 ला साजरा केला जाईल. या दिवशी सूर्य सकाळी 9 वाजून 3 मिनिटांनी मकर राशीत प्रवेश करेल. या दिवशी पुण्य काळ सकाळी 9:03 ते संध्याकाळी 5:40 पर्यंत आणि महापुण्य काळ सकाळी 9:03 ते 10:48 पर्यंत असेल. या दिवशी स्नान आणि दान करण्याला विशेष महत्त्व आहे. याच वेळी तुम्ही दान करू शकता. तसेच, या शुभ मुहूर्तावर पुजा करणे देखील चांगले मानले जाते.
मकर संक्रांतीच्या सणाला विशेष महत्त्व
मकर संक्रांती (Makar Sankranti) हा वर्षातील पहिलाच सण. या सणाला हिंदू धर्मामध्ये विशेष महत्त्व आहे. प्रत्येक राज्यात या सणाला वेगवेगळी नावे आहेत. महाराष्ट्रात संक्रांत, पश्चिम बंगालमध्ये मोकोर सोनक्रांती, दक्षिण भारतात पोंगल अशा नावाने हा सण ओळखला जातो.या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते. या दिवशी सूर्यदेवाची अर्घ्य देऊन पूजा केली जाते. तसेच, या दिवशी तिळाचे दान करणे शुभ मानले जाते.