कर्मचाऱ्यांना Zomato वरूनच ऑर्डर करण्याची सक्ती? ‘त्या’ पोस्टने खळबळ, आता दीपिंदर गोयल यांनी दिले उत्तर

Deepinder Goyal on Allegations Against Zomato

Deepinder Goyal on Allegations Against Zomato | ऑनलाइन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म झोमॅटोच्या (Zomato) विरोधात सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या आरोपांवर कंपनीचे सीईओ दीपिंदर गोयल यांनी उत्तर दिले आहे. X (ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत त्यांनी आरोपांना ‘मूर्खपणाचे’ म्हटले आहे. त्यांनी स्पष्ट केले की झोमॅटो बाजारातील हिस्सेदारी गमावत नाहीये आणि कर्मचाऱ्यांवर झोमॅटोवरून ऑर्डर करण्यासाठी कोणताही दबाव आणला जात नाही.

दीपिंदर गोयल म्हणाले, “हे स्पष्टीकरण देणे लाजिरवाणे असले तरी अनेकांनी चिंता व्यक्त केल्यामुळे मला यावर खुलासा करावा लागला.”

काय आहेत झोमॅटोविरोधातील आरोप?

ही वादग्रस्त चर्चा 25 एप्रिल रोजी एका रेडिट (Reddit) पोस्टमधून सुरू झाली. या पोस्टमध्ये एका युजरने दावा केला की, झोमॅटोची अंतर्गत स्थिती बिघडली आहे आणि स्विगी (Swiggy) व झेप्टो कॅफे (Zepto Cafe) सारख्या प्रतिस्पर्ध्यांमुळे कंपनी आपली बाजारातील हिस्सेदारी गमावत आहे.

याशिवाय, कर्मचाऱ्यांसाठी दर महिन्याला किमान 7 वेळा झोमॅटोवरून ऑर्डर करण्याची सक्ती करण्यात आल्याचा आणि इतर प्रतिस्पर्धी अॅप्स वापरण्यावर बंदी घातल्याचा आरोपही करण्यात आला आहे. रेडिट पोस्टमध्ये झोमॅटोच्या कामाच्या संस्कृतीला ‘विषारी’ असे संबोधले गेले असून, ऑफिस पॉलिटिक्स, मायक्रो मॅनेजमेंट आणि सार्वजनिक अपमानाचे आरोपही केले आहेत.

डिलिव्हरी मॉडेलवरही प्रश्नचिन्ह

रेडिट पोस्टनुसार, झोमॅटो डिलिव्हरी पार्टनर्सना इतर प्लॅटफॉर्म्सच्या तुलनेत कमी पैसे देते, त्यामुळे बरेच डिलिव्हरी पार्टनर स्विगी आणि इतर ठिकाणी स्थलांतर करत आहेत. शिवाय, ऑर्डर गायब होण्याच्या घटनाही वाढल्याचा आरोप करण्यात आला आहे, ज्यामुळे ग्राहक, डिलिव्हरी एजंट आणि रेस्टॉरंट पार्टनर्स सर्वच नाराज आहेत.

दीपिंदर गोयल यांचे उत्तर

या सर्व आरोपांवर प्रतिक्रिया देताना दीपिंदर गोयल यांनी ठामपणे सांगितले, की झोमॅटो कर्मचाऱ्यांच्या ‘फ्रीडम ऑफ चॉइस’ चा आदर करते. त्यांनी लिहिले, “ना आम्ही बाजारातील हिस्सेदारी गमावत आहोत, ना कर्मचाऱ्यांवर कोणतीही सक्ती करत आहोत.”

सध्या दीपिंदर गोयल यांनी या व्हायरल पोस्टविरोधात कोणतीही कायदेशीर कारवाई करणार का, याबाबत अधिकृत माहिती दिलेली नाही. परंतु, या व्हायरल होणाऱ्या रेडिट पोस्टमुळे झोमॅटोविषयी सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.