Tahawwur Rana Extradition : कोण आहेत नरेंद्र मान? तहव्वुर राणा केसमध्ये केंद्र सरकारने सोपवली महत्त्वाची जबाबदारी

Narender Mann | मुंबईवरील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याशी संबंधित प्रमुख सूत्रधार तहव्वुर राणा (Tahawwur Rana Extradition) याला लवकरच भारतात आणले जाणार आहे. राष्ट्रीय तपास संस्था (NIA) याच्या प्रत्यार्पणाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, NIA ची 7 सदस्यीय विशेष टीम अमेरिकेतून राणाला घेऊन थेट दिल्लीला आणत आहे.

याच पार्श्वभूमीवर या बहुचर्चित खटल्यात केंद्र सरकारने वरिष्ठ अधिवक्ता नरेंद्र मान (Narender Mann) यांची विशेष सरकारी वकील (Special Public Prosecutor) म्हणून नियुक्ती केली आहे. गृह मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, मान यांना पुढील 3 वर्षांसाठी किंवा खटला पूर्ण होईपर्यंत, यापैकी जे आधी होईल त्या कालावधीसाठी NIA च्या वतीने नियुक्त करण्यात आले आहे.

कोण आहेत नरेंद्र मान?

नरेंद्र मान हे अनुभवी विधिज्ञ असून त्यांनी यापूर्वीही अनेक महत्त्वाच्या प्रकरणांमध्ये सरकारी वकील म्हणून यशस्वी कामगिरी केली आहे. विशेषतः 2018 मधील कर्मचारी निवड आयोग (SSC) पेपरफुटी घोटाळ्यात त्यांनी सरकारी बाजूचा युक्तिवाद केला होता. त्यांच्या अनुभवाच्या जोरावरच केंद्र सरकारने त्यांची या गंभीर खटल्यासाठी निवड केली आहे.

राणाला कोठे ठेवले जाईल?

सुरुवातीच्या टप्प्यात तहव्वुर राणा NIA च्या ताब्यात राहणार असून, चौकशीसाठी आवश्यक कायदेशीर प्रक्रिया यावेळी पूर्ण केल्या जातील. त्यानंतर त्याला तिहार तुरुंगात हलवले जाण्याची शक्यता आहे. त्याच्यावर विशेष NIA न्यायालयात खटला चालवला जाणार आहे.

26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईवर झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात 160 हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला होता, तर शेकडो जखमी झाले होते. या हल्ल्यामागे पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तोयबाचा (Lashkar-e-Taiba) हात असल्याचे सिद्ध झाले होते. तहव्वुर राणा याच हल्ल्याच्या कटकारस्थानात सामील असल्याचे अनेक पुरावे समोर आले असून, त्याच अनुषंगाने त्याचे प्रत्यार्पण केले जात आहे.