Tahawwur Rana Extradition | 2008 मधील मुंबई दहशतवादी हल्ल्यातील (2008 Mumbai terror attacks) मुख्य आरोपी आणि पाकिस्तानी वंशाचा कॅनेडियन नागरिक तहव्वूर हुसेन राणा (Tahawwur Hussain Rana) याला अखेर भारतात आणण्यात आले. त्याला अमेरिकेहून प्रत्यार्पित करून भारतात आणण्यात आले असून, राष्ट्रीय तपास संस्था (NIA) कडून अटक करण्यात आली.
64 वर्षीय राणा हा लॉस एंजेलिसहून निघालेल्या विशेष विमानातून नवी दिल्ली येथे उतरला. विमानतळावर उतरल्यानंतर तातडीने कायदेशीर प्रक्रिया पार पाडून NIA अधिकाऱ्यांनी त्याला ताब्यात घेतले. राणासोबत NIA आणि राष्ट्रीय सुरक्षा रक्षक दलाचे (NSG) वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते.
त्याला भारतात आणल्यानंतरचा पहिला फोटो समोर आला आहे. यामध्ये त्याची वाढलेले दाढी, काळा चष्मा आणि चॉकलेटी रंगाच्या कपड्यांमध्ये दिसत आहे.
राणाची भारतातली अटक ही अमेरिकेतील दीर्घ कायदेशीर लढाईनंतर शक्य झाली आहे. त्याने प्रत्यार्पण टाळण्यासाठी विविध कोर्टात अपील केली होती, पण अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने (US Supreme Court) याच आठवड्यात त्याची मागणी फेटाळली आणि भारत सरकारच्या वर्षभराच्या प्रयत्नांना यश मिळाले.
तहव्वूर राणा याचे संबंध पाकिस्तानी-अमेरिकन दहशतवादी डेव्हिड कोलमन हेडली (David Coleman Headley) उर्फ दाऊद गिलानी याच्याशी असल्याचे समोर आले आहे. हेडलीनेच 2008 च्या हल्ल्याचे (Mumbai attacks) सर्व नियोजन केले होते आणि त्यासाठी पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तैयबा (Lashkar-e-Taiba) या संघटनेच्या 10 दहशतवाद्यांनी मुंबईत 12 ठिकाणी समन्वयाने गोळीबार आणि बॉम्बस्फोट घडवून आणले होते. या हल्ल्यात 166 नागरिकांचा मृत्यू झाला होता.
सरकारी वकिलांच्या मते, शिकागोमधील राणाचे इमिग्रेशन लॉ सेंटर (immigration law centre) आणि त्याचे मुंबईतील उपकेंद्र 2006 ते 2008 दरम्यान दहशतवादी कारवायांसाठी वापरले गेले. त्याच्यावर हेडली आणि पाकिस्तानमधील इतर दहशतवाद्यांना हल्ल्याचे नियोजन करण्यासाठी मदत केल्याचा आरोप आहे.
या प्रत्यार्पणाची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या फेब्रुवारी 2025 मधील अमेरिका दौर्यात झाली होती. त्यावेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी पत्रकार परिषदेत, “आम्ही एका हिंसक गुन्हेगाराला भारतात परत पाठवत आहोत, जेणेकरून त्याला भारतीय न्याय मिळेल,” असे स्पष्ट केले होते.
राणाच्या अटकेवर प्रतिक्रिया देताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी मोदी सरकारच्या मुत्सद्देगिरीचे हे मोठे यश असल्याचे सांगितले. “भारतीय भूमीचा आणि लोकांचा गैरवापर करणाऱ्या प्रत्येकाला परत आणणे हे आमचे कर्तव्य आहे,” असे त्यांनी ‘एक्स’ (X) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर म्हटले.