Prince Al-Waleed bin Khaled bin Talal | सौदी राजघराण्याचे सदस्य आणि ‘स्लीपिंग प्रिन्स’ (Sleeping Prince) म्हणून ओळखले जाणारे राजकुमार अल-वलीद बिन खालिद बिन तलाल (Al-Waleed bin Khaled) यांनी नुकताच (18 एप्रिल) आपला 36वा वाढदिवस साजरा केला. अल वलीद गेल्या 20 वर्षांपासून कोमात आहे.
आता वाढदिवसाच्या निमित्ताने पुन्हा एकदा सोशल मीडियावर त्यांची चर्चा रंगली आहे. गेली 20 वर्षांपासून कोमात असल्याने त्यांना ‘स्लीपिंग प्रिन्स’ म्हणूनही ओळखले जाते.
2005 मध्ये मिलिटरी कॉलेजमध्ये शिकत असताना झालेल्या एका भीषण कार अपघातानंतर अल-वलीद कोमात गेले. रियाधमधील किंग अब्दुलअझीझ मेडिकल सिटीमध्ये लाईफ सपोर्टवर त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांच्या प्राणवायूच्या पुरवठ्यासाठी व्हेंटिलेटर, अन्नासाठी फीडिंग ट्यूब आणि प्रत्येक हालचालीवर डॉक्टरांचे लक्ष ठेवले जाते.
या दरम्यान, डॉक्टरांनी त्यांचे वडील राजकुमार खालिद बिन तलाल अल सौद यांना लाईफ सपोर्ट थांबवण्याचा सल्ला दिला होता. पण विश्वास न हरवता त्यांनी तो नाकारला. “जर ईश्वराला मृत्यूच ठरवायचा असता, तर तो आधीच घडला असता,” असे ते म्हणाले.
2019 मध्ये राजकुमार अल-वलीद यांनी सौम्य हालचाली, जसे की डोके हलवणे किंवा बोट उचलणे दाखवल्या, ज्यामुळे त्यांच्या पुनरागमनाची क्षीण आशा निर्माण झाली होती. मात्र, वैद्यकीय दृष्टिकोनातून त्या हालचाली पुरेशा नव्हत्या.
त्यांचा सौदी राजघराण्याशी नेमका काय संबंध?
राजकुमार अल-वलीद बिन खालिद बिन तलाल हे सौदी राजघराण्याचे सदस्य असले तरी, ते सध्याच्या राजा सलमान यांचे थेट पुत्र किंवा भाऊ नाहीत.
त्यांचे आजोबा, राजकुमार तलाल बिन अब्दुलअझीझ अल सौद, हे आधुनिक सौदी अरेबियाचे संस्थापक राजा अब्दुलअझीझ अल सौद यांचे अनेक पुत्रांपैकी एक होते. या वंशामुळे राजकुमार अल-वलीद हे राजा अब्दुलअझीझ यांचे पणतू ठरतात.
दरम्यान, सध्याचे शासक किंग सलमान बिन अब्दुलअझीझ अल सौद हे देखील राजा अब्दुलअझीझ यांचे पुत्र आहेत, त्यामुळे ते राजकुमार अल-वलीद यांचे काका (great-uncle) ठरतात.
राजकुमाराच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर अनेकांनी त्यांच्या जुन्या फोटोंना उजाळा दिला. काहींनी त्यांच्या संघर्षशील कुटुंबाला सलाम करत भावनिक श्रद्धांजली दिली.