Helicopter crash in New York’s Hudson River | अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये एक पर्यटक हेलिकॉप्टर (Helicopter crash Hudson River) हडसन नदीत कोसळून भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या भीषण अपघातात सिएमेंस (Siemens) कंपनीचे वरिष्ठ अधिकारी ऑगस्टिन एस्कोबार (Augustin Escobar), त्यांचे संपूर्ण कुटुंब आणि वैमानिक यांचा मृत्यू झाला. एकूण 6 जणांचा मृत्यू झाला आहे.
हेलिकॉप्टरने वॉल स्ट्रीट हेलिपोर्टवरूनदुपारी 3 वाजता उड्डाण केलं. जॉर्ज वॉशिंग्टन ब्रिजपर्यंत पोहोचल्यावर हवेतच यंत्रणा बिघडली आणि ते थेट पियर 40 जवळ कोसळलं. प्रत्यक्षदर्शींच्या मते, रोटरचा एक भाग तुटला आणि हेलिकॉप्टर नियंत्रणाबाहेर गेलं.
या दुर्घटनेत ऑगस्टिन एस्कोबार यांचा, त्यांची पत्नी मर्स कॅम्प्रुबी मोंटल आणि त्यांची 4, 5 आणि 11 वर्षांची तीन मुले यांच्यासह वैमानिकाचाही मृत्यू झाला.
बचाव पथकांनी हेलिकॉप्टर उलटलेल्या अवस्थेत पूर्णपणे बुडालेलं सापडलं. अपघाताचं कारण शोधण्यासाठी नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्ड (NTSB) तपास करत आहे.
कोण होते ऑगस्टिन एस्कोबार (Augustin Escobar)?
एस्कोबार हे 2022 पासून सिएमेंस स्पेनचे (Siemens Spain) प्रमुख होते. ते सिएमेंस मोबिलिटी (Siemens Mobility) विभागाचे जागतिक प्रमुख होते. रेल्वे प्रकल्प आणि वाहतूक प्रणालींसाठी त्यांचे योगदान महत्त्वाचे मानले जात होते.
ही जर्मनीस्थित बहुराष्ट्रीय कंपनी ऊर्जा, उद्योग, वाहतूक आणि आरोग्य सेवा तंत्रज्ञान यांसारख्या क्षेत्रांमध्ये कार्यरत आहे.लिंक्डइन (LinkedIn) प्रोफाइलनुसार त्यांचा 25 वर्षांपेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय अनुभव होता.
या घटनेवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) आणि न्यूयॉर्कचे महापौर एरिक एडम्स (Eric Adams) यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे.