वाह! ‘या’ भारतीय चित्रकाराच्या पेटिंगसाठी लागली तब्बल 61 कोटीं रुपयांची बोली

Trussed Bull

दिवंगत प्रसिद्ध चित्रकार एम एफ हुसेन यांच्या ‘अनटाइटल्ड (ग्राम यात्रा)’ या कलाकृतीने काही आठवड्यांपूर्वी आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी किंमत मिळवल्यानंतर, आता सफ्रनआर्टच्या 25 व्या वर्धापन दिनाच्या विशेष लिलावात दक्षिण आशियाई कलाकृतींच्या विक्रीचा नवा उच्चांक गाठला गेला आहे. या लिलावात कलाकृतींवर एकूण 217.81 कोटी रुपयांची (जवळपास $25.62 दशलक्ष) बोली लागली.

या लिलावातील प्रसिद्ध कलाकार तैयब मेहता (Tyeb Mehta) यांच्या 1956 मधील ‘ट्रस्ड बुल’ (Trussed Bull) या कलाकृतीला विक्रमी बोली लागली. या चित्राला तब्बल 61.80 कोटी रुपये (जवळपास $7.27 दशलक्ष) इतकी अभूतपूर्व बोली लागली, जी त्याच्या अंदाजित किंमतीच्या जवळपास नऊ पट अधिक आहे.

या विक्रमामुळे ‘ट्रस्ड बुल’ आता लिलावात सर्वाधिक बोली लागलेल्या भारतीय कलाकारांच्या (Modern Indian Art) दुसऱ्या क्रमांकाच्या कलाकृतींच्या यादीत अमृता शेर-गिल यांच्या ‘द स्टोरी टेलर’ (1937) सोबत सामील झाले आहे. विशेष म्हणजे, ‘द स्टोरी टेलर’ ची विक्री देखील 2023 मध्ये याच किंमतीत झाली होती.

सफ्रनआर्टचा हा लिलाव अनेक अर्थांनी खास ठरला. लिलावात मांडलेल्या सर्वच्या सर्व 75 कलाकृतींना खरेदीदार मिळाले, म्हणजेच हा ‘व्हाइट ग्लोव्ह’ लिलाव होता. याशिवाय, 80 टक्के कलाकृतींनी त्यांच्या अपेक्षेपेक्षा जास्त किंमत मिळवली, ज्यात अनेक दुर्मिळ कलाकृतींचा समावेश होता.

तैयब मेहता यांच्या इतर कलाकृतींनाही चांगला प्रतिसाद मिळाला. त्यांची ‘अनटाइटल्ड (2006)’ ही कलाकृती 9 कोटी रुपयांना (जवळपास $1.05 दशलक्ष) विकली गेली. विशेष म्हणजे, या दोन्ही कलाकृती मेहता कुटुंबीयांच्या खासगी संग्रहातून आल्या होत्या.

या लिलावात इतरही अनेक कलाकारांच्या उत्कृष्ट कामांना चांगली मागणी मिळाली. अमृता शेर-गिल यांच्या 1932 मधील ‘स्टिल लाईफ विथ ग्रीन बॉटल्स अँड ॲपल्स’ या चित्राला 24 कोटी रुपयांची (जवळपास $2.82 दशलक्ष) बोली लागली. शेर-गिल यांनी फार कमी स्थिर वस्तूंची चित्रे रंगवल्यामुळे या कामाला विशेष महत्त्व होते. एफ एन सौझा यांच्या 1987 मधील ‘सपर ॲट इम्मॉस’ या चित्रासाठी 15.30 कोटी रुपये (जवळपास $1.8 दशलक्ष) बोली लागली.

याव्यतिरिक्त, एडविन लॉर्ड वीक्स यांच्या ‘लेक ॲट उदेपूर, इंडिया’ (circa 1893) या चित्राने 12 कोटी रुपये (जवळपास $1.41 दशलक्ष) मिळवून जागतिक स्तरावर कलाकाराच्या दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक किंमत नोंदवली, तर शक्ती बर्मन यांच्या ‘दुर्गा’ (circa 1995) या कलाकृतीसाठी 7.20 कोटी रुपये (जवळपास $847,059) बोली लागली.