‘विशेष मैत्री’ असूनही रशियाचा भारतीय औषध कंपनीच्या गोदामावर हल्ला? युक्रेनने केला मोठा दावा

Russia

Russia Ukraine War | युक्रेनमधील भारतीय औषध कंपनीच्या गोदामावर रशियाने क्षेपणास्त्र (Russia missile India pharma) हल्ला केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. युक्रेनच्या भारतातील दूतावासाने याबाबत दावा केला आहे. रशियाचे नवी दिल्लीसोबत “विशेष मैत्रीचे” संबंध असूनही “जाणूनबुजून” भारतीय व्यवसायांना लक्ष्य केल्याचा दावाही दूतावासाने केला आहे.

रशियन (Russia Ukraine War) हल्ल्यात उद्ध्वस्त झालेले गोदाम भारतातील मोठी औषध कंपनी (Indian Company Missile Attack) असलेल्या ‘कुसुम’ चे आहे. युक्रेनच्या भारतातील दूतावासाने ट्विट केले की, “आज रशियन क्षेपणास्त्राने युक्रेनमधील भारतीय औषध कंपनी कुसुमच्या गोदामावर हल्ला केला.भारतासोबत ‘विशेष मैत्री’ असल्याचा दावा करत असताना, मॉस्को जाणूनबुजून भारतीय व्यवसायांना लक्ष्य करत आहे. लहान मुले आणि वृद्धांसाठी असलेली औषधे नष्ट करत आहे.”

या प्रकरणावर भारत आणि रशिया सरकारकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

युक्रेनमधील ब्रिटनचे राजदूत मार्टिन हॅरिस यांनीही दावा केला आहे की, रशियन हल्ल्यात कीव्हमधील एका “मोठ्या फार्मा कंपनीचे गोदाम” नष्ट झाले. मात्र, त्यांच्या पोस्टमध्ये हे गोदाम कुसुमचे (Kusum Pharma Ukraine) आहे की नाही याचा उल्लेख नव्हता आणि हा हल्ला रशियन ड्रोनने केला होता, क्षेपणास्त्राने नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.

हॅरिस यांनी ट्विट केले, “रशियन ड्रोनने कीव्हमधील एका मोठ्या औषध कंपनीचे गोदाम पूर्णपणे उद्ध्वस्त केले, ज्यात वृद्ध आणि मुलांसाठी आवश्यक असलेल्या औषधांचा साठा जळून खाक झाला. रशियाचा युक्रेनियन नागरिकांविरुद्धची मोहिम सुरूच आहे.”

राजदूतांनी एका इमारतीतून धूर निघतानाचा आणि घटनास्थळी अग्निशमन दलाचे वाहन उभे असलेला फोटो पोस्ट केला आहे.

यापूर्वी, रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने दावा केला होता की युक्रेनने गेल्या चोवीस तासांत रशियाच्या ऊर्जा पायाभूत सुविधांवर पाच हल्ले केले आहेत, जे अमेरिकेने मध्यस्थी केलेल्या अशा हल्ल्यांवरील स्थगितीचे उल्लंघन आहे.

मागील महिन्यात, फेब्रुवारी 2022 मध्ये मॉस्कोने शेजारील देशावर आक्रमण केल्यापासून एकमेकांशी लढणाऱ्या युक्रेन आणि रशियाने एकमेकांच्या ऊर्जा प्रकल्पांवर हल्ले थांबवण्यास सहमती दर्शविली होती. मात्र, न्ही बाजूंनी वारंवार एकमेकांवर स्थगिती मोडल्याचा आरोप केला आहे.