पंतप्रधान मोदींना श्रीलंकेचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘मित्र विभूषण’ प्रदान, द्विपक्षीय संबंध अधिक दृढ

PM Modi Receives Mitra Vibhushana Award | पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना त्यांश्रीलंकेचा सर्वोच्च नागरी सन्मान – ‘श्रीलंका मित्र विभूषण’ प्रदान करण्यात आला. मोदींच्या श्रीलंका दौऱ्यादरम्यान हा सन्मान प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार श्रीलंकेचा परदेशी नेत्यांना दिला जाणारा सर्वोच्च सन्मान असून, हा पुरस्कार प्राप्त करणारे मोदी हे पहिले भारतीय नेते ठरले आहेत.

कोलंबोतील एका औपचारिक समारंभात श्रीलंकेचे अध्यक्ष अनुरा कुमार दिसानायके (Anura Kumara Dissanayake) यांच्या हस्ते हे प्रतिष्ठित पदक त्यांना प्रदान करण्यात आले. हा सन्मान भारत-श्रीलंका (India-Sri Lanka) यांच्यातील ऐतिहासिक संबंध, सांस्कृतिक नातेसंबंध आणि बौद्ध आध्यात्मिक वारशाला दिलेला मान असून, द्विपक्षीय सहकार्याला चालना देणाऱ्या मोदींच्या भूमिकेची आंतरराष्ट्रीय स्तरावर नोंद घेतली गेली आहे.

पुरस्कार स्वीकारताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “हा माझा नव्हे तर 140 कोटी भारतीयांचा गौरव आहे. श्रीलंका आणि भारत यांच्यातील मैत्रीच्या आणि ऐतिहासिक संबंधांच्या मान्यतेचे हे प्रतीक आहे.”

‘मित्र विभूषण’ या पदकाच्या रचनेत धर्मचक्र, पूर्ण कलश, नवरत्न, सूर्य आणि चंद्र अशा प्रतीकांचा समावेश आहे – जे भारत आणि श्रीलंकेतील सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि ऐतिहासिक बंध दर्शवतात. हा सन्मान 2008 मध्ये सुरू करण्यात आला होता आणि आतापर्यंत केवळ 3 नेत्यांना तो प्राप्त झाला आहे – मालदीवचे मौमून अब्दुल गयूम, पॅलेस्टाईनचे महमूद अब्बास आणि यासर अराफत (Yasser Arafat).

पंतप्रधान मोदींचा श्रीलंका दौरा
पंतप्रधान मोदी शुक्रवार 5 एप्रिल रोजी कोलंबोमध्ये दाखल झाले. ऐतिहासिक स्वातंत्र्य चौकात त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. दौऱ्यात मोदी आणि श्रीलंकेचे अध्यक्ष यांच्यात द्विपक्षीय चर्चा झाली. यानंतर भारत-श्रीलंका संबंध दृढ करणाऱ्या अनेक करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या.

महत्त्वाच्या करारांमध्ये त्रिनकोमाली (Trincomalee) येथे ऊर्जा केंद्राची उभारणी, संरक्षण सहकार्य करार आणि बहुक्षेत्रीय आर्थिक मदतीचा समावेश होता. याशिवाय, साम्पुर सौर ऊर्जा प्रकल्प आणि डंबुल्ला कृषी गोदाम यांचे आभासी उद्घाटनही करण्यात आले. पंतप्रधान मोदींचा दौरा दोन्ही देशांमधील नवीन अध्यायाची सुरुवात मानली जात आहे.