Piyush Goyal Remark on StartUP | केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयुष गोयल (Piyush Goyal) यांनी स्टार्टअप महाकुंभ 2025 (Startup Mahakumbh 2025) या कार्यक्रमात बोलताना भारतीय स्टार्टअप संस्कृतीवर जोरदार टीका केली. “आज भारतात बड्या उद्योगपतींच्या मुलांनी आईस्क्रीम आणि कुकीज विकण्याचे स्टार्टअप सुरू केले आहेत आणि त्यालाच ‘नवोन्मेष’ म्हणवले जात आहे. देश तंत्रज्ञानाच्या दिशेने वाटचाल करणार की केवळ ब्रँडेड आईस्क्रीमवर समाधान मानणार?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
गोयल म्हणाले की, “माझ्या माहितीतले 3-4 बड्या उद्योगपतींचे मुलं आज ब्रँडेड आईस्क्रीम-कुकीज बनवतात आणि स्वतःला यशस्वी उद्योजक म्हणवतात.” यासोबत त्यांनी भारतीय आणि चिनी स्टार्टअप (Chinese startups) यामधील फरकही स्पष्ट केला. “चीनमध्ये आज सेमी-कंडक्टर चिप्स, EV बॅटरीज तयार होतात. भारतात केवळ 1,000 डीपटेक स्टार्टअप्स आहेत. तुम्हाला खरंच दुकानदारीच करायची आहे का?” असा सवाल त्यांनी Shark Tank India वरील अमन गुप्ता (Aman Gupta) यांना विचारला.
स्टार्टअप्स परदेशी कंपन्यांकडून केवळ 25 लाख किंवा 50 लाखांत विकले जात आहेत हे पाहून वाईट वाटते. देशाच्या भविष्यासाठी स्टार्टअप्सनी काम केलं पाहिजे, असं आवाहन त्यांनी केलं. मात्र, त्यांच्या या वक्तव्यानंतर उद्योग क्षेत्रातून प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
उद्योग क्षेत्राचा संताप
Infosys चे माजी CFO मोहनदास पै (Mohandas Pai) यांनी X वर लिहिलं, “स्टार्टअप्सवर टीका करण्याऐवजी त्यांनी स्वतः केंद्रीय मंत्री म्हणून डीपटेक स्टार्टअप्ससाठी काय केलं हे विचारावं. सरकारकडून अजूनही पुरेशी मदत मिळत नाही. अँजेल टॅक्सने अनेक स्टार्टअप्सला त्रास दिला आहे.”
BharatPe चे माजी सहसंस्थापक अशनीर ग्रोवर (Ashneer Grover) यांनीही प्रतिक्रिया देताना म्हटलं, “खरं रिअॅलिटी चेक राजकारण्यांना लागतो. चीनमध्येही प्रथम फूड डिलिव्हरी सुरू झाली, त्यानंतर डीपटेक विकसित झालं. आपणही 10%+ GDP ग्रोथसाठी झगडायला हवं, केवळ टीका करून काही साध्य होणार नाही.”
तसेच, Zepto चे CEO आदित पलीचा (Aadit Palicha) यांनी आपल्या स्टार्टअपचं उदाहरण देत म्हटलं, “Zepto मध्ये आज 1.5 लाख लोकांना रोजगार मिळतो. आम्ही दरवर्षी सरकारला 1,000 कोटी रुपये कर भरतो, 1 अब्जहून अधिक FDI उभारली आहे. जर हे भारतीय नवोन्मेषाचं उदाहरण नसेल, तर मग काय?” असा सवाल त्यांनी केला.
दरम्यान, पीयुष गोयल (Piyush Goyal) यांनी स्टार्टअप महाकुंभ 2025 मध्ये केलेल्या वक्तव्यानंतर अनेक उद्योजकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.