Simla Agreement : पाकिस्तानने रद्द केलेला शिमला करार काय आहे? जाणून घ्या

Simla Agreement | जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये (Pahalgam Terror Attack) झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने घेतलेल्या कठोर निर्णयांमुळे पाकिस्तान संतप्त झाला आहे. भारताने सिंधू जल करार (Indus Waters Treaty) स्थगित केला असून, पाकिस्तानी नागरिकांना व्हिसा नाकारण्याचा आणि दोन्ही देशांतील दूतावास कर्मचाऱ्यांची संख्या कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.

या पार्श्वभूमीवर पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा समितीची बैठक पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत पाकिस्तानने भारतविरोधात पावलं उचलली आहेत. त्यानुसार, पाकिस्तानने भारताला आपले हवाई क्षेत्र वापरण्यास बंदी घालण्याची घोषणा केली आहे. तसेच, 1972 मध्ये भारतासोबत झालेला शिमला करार (Simla Agreement) देखील निलंबित करण्यात आल्याची माहिती दिली आहे.

भारत आणि पाकिस्तानमध्ये कधी झाला होता शिमला करार?

भारताने लष्करी हस्तक्षेप करून मार्च 1971 मध्ये पूर्व पाकिस्तानला पाकिस्तानपासून वेगळे केले आणि जगाच्या नकाशावर बांगलादेश नावाचा एक नवीन देश निर्माण केला. पाकिस्तानच्या सैन्याने बांगलादेशात भारताच्या सैन्यासमोर आत्मसमर्पण केले होते. भारताने जवळपास 90 हजार लोकांना युद्धबंदी बनवले होते. यात बहुतेक सैनिक किंवा निमलष्करी दलाचे जवान होते. भारताने पश्चिम पाकिस्तानच्या जवळपास पाच हजार चौरस मैल भागावरही कब्जा केला होता.

शिमला करारावर कोणी केली होती स्वाक्षरी?

यानंतर सुमारे 16 महिन्यांनी हिमाचल प्रदेशची राजधानी शिमला येथे तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी आणि पाकिस्तानचे तत्कालीन राष्ट्रपती झुल्फिकार अली भुट्टो यांची भेट झाली. दोन्ही नेत्यांनी तेथे 2 जुलै 1972 रोजी एका करारावर स्वाक्षरी केली. या कराराला आपण ‘शिमला करार’ म्हणून ओळखतो. या करारामध्ये दोन्ही देशांनी शांततापूर्ण मार्गांनी आणि चर्चेद्वारे आपले मतभेद सोडवण्याची बांधिलकी दर्शविली होती. याचा उद्देश शांतता राखणे आणि संबंध सुधारणे हा होता.

शिमला करारामध्ये काय आहे?

  • या कराराद्वारे भारत आणि पाकिस्तानने ठरवले की दोन्ही देश कोणतेही विवाद आपापसातील चर्चेतून सोडवतील. यात कोणताही तिसरा देश किंवा संघटना हस्तक्षेप करणार नाही.
  • काश्मीरमधील भारत आणि पाकिस्तानमधील नियंत्रण रेषा (Line of Control – LoC) कोणताही देश एकतर्फी बदलणार नाही. दोन्ही देश त्याचा आदर करतील.
  • दोन्ही देशांनी एकमेकांविरुद्ध हिंसा, युद्ध किंवा चुकीचा प्रचार करणार नाही, दोन्ही शांततेत राहतील आणि आपले संबंध सुधारतील.
  • भारताने युद्धबंदी बनवलेल्या पाकिस्तानच्या 90 हजार लोकांना सोडले आणि कब्जा केलेली जमीन परत केली. पाकिस्ताननेही काही भारतीय सैनिकांना सोडले होते.

पाकिस्तानकडून शिमला करार निलंबित केल्याने भारत-पाक संबंधांमध्ये पुन्हा एकदा तणाव वाढण्याची शक्यता आहे.

Share:

More Posts