iPhone Price Hike | अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी जागतिक व्यापारावर मोठा परिणाम करणारे आयात शुल्क लादले असून, त्यामुळे ग्राहक वस्तूंच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढू शकतात. विशेषतः आयफोनला (iPhone) यामुळे सर्वाधिक फटका बसू शकतो, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. खर्च वाढल्यास Apple (Apple) कंपनी तो ग्राहकांकडून वसूल करण्याची शक्यता आहे.
Apple कडून दरवर्षी 220 दशलक्षांहून अधिक iPhone विक्री केली जाते. हे बहुतांश फोन अजूनही चीन (China) मध्ये तयार होतात. सध्या चीनवर 54 टक्के शुल्क लावण्यात आले आहे. हे शुल्क कायम राहिल्यास, Apple समोर मोठा प्रश्न उभा राहतो की वाढीव खर्च स्वतः सहन करायचा की ग्राहकांवर टाकायचा?
ट्रम्प यांच्या टॅरिफ घोषणेनंतर Apple च्या शेअर्समध्ये 9.3 टक्क्यांची मोठी घसरण झाली, जी मार्च 2020 नंतरची सर्वात मोठी घसरण होती. विश्लेषकांच्या अंदाजानुसार, जर Apple ने 43 टक्क्यांचा वाढीव खर्च ग्राहकांकडून वसूल केला, तर सध्याचा 799 डॉलरचा iPhone 16 (iPhone 16) 1142 डॉलरपर्यंत महाग होऊ शकतो. या किंमती अमेरिकेतील ग्राहकांसाठी वाढू शकतात.
6.9 इंच डिस्प्ले आणि 1TB स्टोरेज असलेलं मॉडेल, iPhone 16 Pro Max, सध्या 1599 डॉलरमध्ये विकले जाते. वाढीचा भार ग्राहकांवर टाकल्यास त्याची किंमत सुमारे 2300 डॉलर (2 लाख रुपयांपेक्षा अधिक) होण्याची शक्यता आहे.
फेब्रुवारीमध्ये लाँच झालेल्या स्वस्त iPhone 16e ची किंमत 599 डॉलर आहे. वाढ झाल्यास त्याची किंमत 856 डॉलरपर्यंत जाऊ शकते.याबाबत Apple ने अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.
दरम्यान, बहुतेक iPhone अजूनही चीनमध्येच तयार होतात. काही उत्पादन भारत (India) आणि व्हिएतनाम (Vietnam) मध्ये हलवले गेले असले तरी, तिथेही शुल्क लावण्यात आले आहेत. अमेरिकेने भारतावर 26 टक्के आणि व्हिएतनामवर 46 टक्के टॅरिफ लावला आहे.