कर्नाटकचे माजी डीजीपी ओम प्रकाश यांचा संशयास्पद मृत्यू, हत्येचा संशय, पत्नीची चौकशी सुरू

Karnataka Retired DGP Om Prakash

Karnataka Retired DGP Om Prakash | कर्नाटक राज्याचे माजी पोलीस महासंचालक ओम प्रकाश (Om Prakash) हे रविवारी (20 एप्रिल) दुपारी त्यांच्या बंगळूरुतील एचएसआर लेआउट (HSR Layout) येथील घरी मृतावस्थेत आढळले. 68 वर्षीय निवृत्त आयपीएस अधिकारी ओम प्रकाश निवासस्थानी मृतावस्थेत आढळल्याने बेंगळुरुमध्ये एकच खळबळ उडाली

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचे शरीरावर अनेक वार झाल्याचे प्राथमिक तपासात आढळले आहे, ही हत्या धारदार शस्त्राने केल्याचा प्राथमिक संशय आहे.

रिपोर्टनुसार, या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून पत्नी पल्लवी (Wife Pallavi) यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशीला सुरुवात केली आहे.

अतिरिक्त पोलीस आयुक्त विकास कुमार (Vikas Kumar) यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतदेहाजवळ एक धारदार शस्त्र सापडले असून, हे खूनासाठी वापरण्यात आलेले शस्त्र आहे का, हे तपासानंतर स्पष्ट होईल. त्यांनी सांगितले की, “पोलिसांना दुपारी सुमारे 4.30 वाजता घटनेची माहिती मिळाली. मृतकाच्या मुलाने तक्रार दाखल केली असून त्यावर एफआयआर दाखल करण्यात आला आहे.”

तपासादरम्यान हे स्पष्ट झाले आहे की घटनेच्या वेळी ओम प्रकाश हे त्यांच्या पत्नी आणि मुलीसोबत होते. पोलिसांना माहिती देण्याआधी दोघींनी स्वतःला एका खोलीत बंद केल्याचेही सांगण्यात आले आहे.

पोलिसांनी सध्या कोणत्याही मालमत्तेच्या वादासंबंधीच्या अफवांना नकार दिला असून, “तपास सुरू आहे. घटनास्थळाची संपूर्ण पाहणी आणि शवविच्छेदन झाल्यानंतरच नेमकी माहिती दिली जाईल,” असं अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, बिहारचे मूळ रहिवासी असलेले ओम प्रकाश हे 1981 बॅचचे आयपीएस अधिकारी (1981 IPS Batch) होते. त्यांनी कारकिर्दीची सुरुवात बेल्लारी जिल्ह्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून केली होती. त्यानंतर अनेक जिल्ह्यांमध्ये एसपी, लोकायुक्त पोलीस विभाग व गुन्हे अन्वेषण विभागाचे डीआयजी म्हणून त्यांनी सेवा दिली. 2015 मध्ये त्यांनी डीजीपी पदाची सूत्रे स्वीकारली आणि 2017 मध्ये ते निवृत्त झाले.