Dr. Reddy’s cuts workforce | हैदराबादस्थित आघाडीची औषधनिर्माता कंपनी डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज (Dr. Reddy’s Laboratories) सध्या खर्च कपात करण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती समोर आली आहे. रिपोर्टनुसार, कंपनी सुमारे 25% कर्मचाऱ्यांची कपात करण्याच्या विचारात आहे. मात्र, कंपनीने ही माहिती फेटाळली आहे.
उच्च-वेतनश्रेणीतील कर्मचाऱ्यांना राजीनाम्याची सूचना?
रिपोर्टनुसार, कंपनीतील कर्मचाऱ्यांशी संबंधित खर्च कमी करण्यासाठी आंतरिक निर्देशांनुसार काही निर्णय घेतले जात आहेत. अंदाजे 1 कोटी रुपये वार्षिक पॅकेज असलेल्या वरिष्ठ कर्मचाऱ्यांना राजीनामा देण्यास सांगण्यात आले असून, संशोधन आणि विकास (R&D) विभागातील 50 ते 55 वयोगटातील कर्मचाऱ्यांना ऐच्छिक सेवानिवृत्ती (VRS) देण्याचा प्रस्ताव दिला गेल्याची माहिती ही या अहवालात देण्यात आली आहे.
डॉ. रेड्डीजवर 2,395 कोटींची आयकर नोटीस
याचदरम्यान, डॉ. रेड्डीजला Income Tax Department कडून मोठ्या रकमेसाठी नोटीस बजावण्यात आली आहे. एक्सचेंज फाइलिंगनुसार, 4 एप्रिल 2025 रोजी कंपनीला 2,395 कोटी रुपयांची कारणे दाखवा नोटीस प्राप्त झाली आहे. ही नोटीस आयकर कायदा 1961 मधील कलम 148A(1) अंतर्गत देण्यात आली असून, 2020-21 या मूल्यांकन वर्षासाठी विवरणपत्रांची पुन्हा चौकशी का केली जावी, याबाबत कारणे विचारण्यात आली आहेत. मात्र, कंपनीने स्पष्ट केलं आहे की या नोटीसमुळे सध्यातरी त्यांच्या आर्थिक स्थितीवर कोणताही गंभीर परिणाम होणार नाही.
कर्मचारी कपातीबाबत बोलताना डॉ. रेड्डीजने अधिकृत निवेदन जारी करत सर्व दावे फेटाळले. कंपनीने म्हटले आहे की, “कर्मचाऱ्यांच्या 25% खर्च कपात करण्याचा दावा चुकीचा असून, आम्ही तो स्पष्टपणे नाकारतो. अशा कुठल्याही घटनेबाबत सध्या SEBI च्या लिस्टिंग नियमांतर्गत अधिकृत खुलासा करण्यासारखी माहिती आमच्याकडे नाही.”
कंपनीने पुढे नमूद केले की, “आम्ही SEBI च्या नियमानुसार आवश्यक ती माहिती वेळेत देत असतो. सध्या या विषयावर कोणतीही अधिकृत कारवाईची आवश्यकता भासलेली नाही.”