Share Market Crash : पुन्हा एकदा ‘ब्लॅक मंडे’? शेअर बाजारात 1987 ची पुनरावृत्ती होणार, ट्रम्प-टॅरिफ्समुळे जागतिक संकट

Share Market Crash | जगभरातील शेअर बाजारात पुन्हा एकदा मोठ्या पडझडीचे सावट घोंगावत आहे. 1987 मध्ये ‘ब्लॅक मंडे’ (Black Monday) म्हणून ओळखल्या गेलेल्या ऐतिहासिक आर्थिक संकटासारखी स्थिती 2025 मध्ये पुन्हा निर्माण होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या आक्रमक शुल्क धोरणामुळे जागतिक बाजारपेठांमध्ये गोंधळाचे वातावरण असून, यामुळे शेअर बाजारात प्रचंड घसरण होण्याची भीती प्रसिद्ध आर्थिक विश्लेषक जिम क्रेमर (Jim Cramer) यांनी वर्तवली आहे.

जागतिक पातळीवरील वाढती व्यापारिक अस्थिरता (global trade tension) आणि अमेरिकेत मंदीचे सावट (US recession fear) यामुळे भारतीय शेअर बाजारात आज (7 एप्रिल) मोठी घसरण झाली.

सकाळी 9:15वाजता बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (Bombay Stock Exchange) अर्थात BSE चा सेन्सेक्स तब्बल 3,072 अंकांनी म्हणजेच 4.09% नी कोसळून 72,296 अंकांवर पोहोचला. त्याचवेळी नॅशनल स्टॉक एक्सचेंज (National Stock Exchange) चा निफ्टी 50 1,146 अंकांनी, म्हणजेच 5% नी घसरून 21,758 अंकांवर स्थिरावला. जून महिन्याच्या सुरुवातीपासून ही आतापर्यंतची सर्वात मोठी एकदिवसीय घसरण ठरली आहे.

या घसरणीमुळे BSE वरील सर्व कंपन्यांचे एकत्रित बाजार भांडवल (market capitalization) तब्बल 19.4 लाख कोटी रुपयांनी कमी झाले असून आता ते 383.95 लाख कोटी रुपयांवर आले आहे.

बाजारातील सर्वच प्रमुख क्षेत्रांमध्ये आज विक्रीचा सपाटा होता. निफ्टी मेटल निर्देशांक (Nifty Metal) सर्वाधिक म्हणजे 8% नी, तर निफ्टी आयटी (Nifty IT) निर्देशांक 7% पेक्षा अधिक घसरला. याशिवाय ऑटो (Auto), रिअल्टी (Realty) आणि ऑईल अँड गॅस (Oil & Gas) क्षेत्रांमध्येही 5% पेक्षा अधिक घसरण नोंदली गेली.

मोठ्या कंपन्यांसोबतच मिड-कॅप (Mid-cap) आणि स्मॉल-कॅप (Small-cap) कंपन्यांच्या शेअर्समध्येही जोरदार घसरण झाली. स्मॉल-कॅप निर्देशांक तब्बल 10% नी, तर मिड-कॅप निर्देशांक 7.3% नी खाली घसरले. जागतिक बाजारात सुरू असलेल्या अस्थिरतेमुळे भारतीय गुंतवणूकदारांमध्ये मोठी भीती निर्माण झाली आहे.

नुकतेच क्रेमर यांनी चेतावणी दिली की, जर ट्रम्प प्रशासनाने आंतरराष्ट्रीय व्यापारातील तणाव कमी करण्यासाठी तत्काळ पावले उचलली नाहीत, तर बाजारात प्रचंड घसरण होऊ शकते. त्यांनी राष्ट्राध्यक्षांना विनंती केली की, ज्या देशांनी अमेरिकेच्या टॅरिफ्सना प्रत्युत्तर दिलेले नाही, त्यांच्याशी सहकार्य साधावे, अन्यथा मोठी आर्थिक उलथापालथ होऊ शकते.

‘ब्लॅक मंडे’ म्हणजे काय?

19 ऑक्टोबर 1987 रोजी, डाऊ जोन्स इंडस्ट्रियल ॲव्हरेज (Dow Jones Industrial Average) मध्ये एका दिवसात तब्बल 22.6% घसरण झाली होती. ही घसरण आजही आर्थिक इतिहासातील सर्वात मोठी एकदिवसीय घसरण मानली जाते. त्याच दिवशी S&P 500 मध्ये 30% इतकी घट झाली होती. या घटनांमुळे ‘ब्लॅक मंडे’ हा दिवस बाजारातील घसरणीचा एक भयावह प्रतीक बनला.

त्यावेळी, या घसरणीसाठी कोणतेही एक कारण नव्हते, पण अनेक घटक कारणीभूत होते – 1982 पासून सातत्याने वाढलेल्या शेअर किमती, संगणकीकृत ‘प्रोग्राम ट्रेडिंग’, आणि ‘ट्रिपल विचिंग’ (Triple Witching) मुळे निर्माण झालेली अनिश्चितता.

‘ब्लॅक मंडे 2.0’ ची शक्यता?

जिम क्रेमर यांनी सांगितले की, 1987 प्रमाणे परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. डाऊ जोन्स फ्युचर्स आधीच 1,405 अंकांनी (3.7%) घसरले आहेत. S&P 500 फ्युचर्समध्ये 4.3% आणि Nasdaq-100 मध्ये 5.4% इतकी घसरण दिसली आहे. बाजारातील या घसरणीमागे टेक कंपन्यांतील मोठ्या प्रमाणावर शेअर विक्री हे एक महत्त्वाचं कारण आहे.

ट्रम्प यांच्या टॅरिफ्स धोरणाचा परिणाम

डोनाल्ड ट्रम्प यांच्या शुल्क धोरणामुळे अमेरिका आणि युरोपसह अनेक देशांमध्ये व्यापार संघर्ष निर्माण झाला आहे. त्याचा परिणाम जागतिक गुंतवणुकीवर झाला असून बाजारपेठा अस्थिर झाल्या आहेत. 4 एप्रिल रोजी अमेरिकन शेअर बाजारात कोविड-19 नंतरची सर्वात वाईट स्थिती पाहायला मिळाली, जिथे $5 ट्रिलियनहून अधिक बाजार भांडवलाची उडाण झाली.