अमरत्वासाठी जीवाचा आटापिटा, पण औषधाने दिला धोका… ब्रायन जॉन्सनच्या अमरत्वाचं महागडं सत्य

Bryan Johnson’s anti-aging experiment | तंत्रज्ञान क्षेत्रातील नामवंत आणि आता बायोहॅकिंगच्या चळवळीचा चेहरा बनलेले ब्रायन जॉन्सन (Brian Johnson) यांची एक धक्कादायक कबुली समोर आली आहे. जैविक वय उलटवण्यासाठी दरवर्षी $2 दशलक्ष इतका खर्च करणाऱ्या जॉन्सन यांनी, आपल्या प्रयोगांमधून मिळालेल्या परिणामांवर पुनर्विचार करण्यास सुरुवात केली आहे.

एका स्पष्ट व्हिडिओमधून त्यांनी उघड केले की, रॅपामायसिन (Rapamycin) नावाच्या औषधाचा वापर त्यांनी दीर्घ काळ केला, मात्र त्याचे परिणाम अपेक्षेप्रमाणे निघाले नाहीत. उलट शरीरावर हानिकारक दुष्परिणाम दिसू लागले. जॉन्सन यांनी हे औषध वय उलटवण्याच्या प्रक्रियेचा भाग म्हणून घेतले होते.

सुरुवातीला उंदरांवरील अभ्यासामधून आणि मानवी चाचण्यांतील सकारात्मक निष्कर्षांमुळे ते आशावादी होते. परंतु प्रत्यक्षात त्यांच्या शरीरात विश्रांतीतील हृदयगती वाढणे, कोलेस्ट्रॉल आणि साखरेची असंतुलन, तसेच जखमा भरून येण्यात विलंब यासारखे नकारात्मक परिणाम दिसून आले.

येल विद्यापीठाच्या (Yale University) संशोधनात स्पष्ट झालं की, रॅपामायसिनमुळे जैविक वृद्धत्वाचे (Biological Aging) संकेतच वेगाने वाढले. जॉन्सन यांच्यासारख्या बायोहॅकर्ससाठी हे निष्कर्ष धक्कादायक ठरले.

“मीही आता हसतोय. घरी बसून हसणाऱ्या सर्वांमध्ये मी स्वतःलाही समाविष्ट करतो,” असं मिश्कीलपणे सांगत जॉन्सन यांनी हे औषध पूर्णपणे बंद केल्याचे जाहीर केले. मात्र त्यांनी हा निर्णय माघार म्हणून नव्हे, तर नव्या प्रयोगशील प्रवासाची सुरुवात मानली आहे.

46 वर्षीय जॉन्सन हे तंत्रज्ञान आणि जैवविज्ञान यांचा संगम घडवत, दीर्घायुष्याच्या आणि अमरत्वाच्या सीमेवर पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांचे प्रयोग हे केवळ विज्ञानाचे नव्हे, तर मानवी इच्छाशक्ती आणि चुकांमधून शिकण्याच्या प्रवृत्तीचेही उदाहरण ठरत आहेत.