शेख हसीना संकटात! बांगलादेशातील न्यायालयाने बजावले अटक वॉरंट, ‘हा’ आहे आरोप

Arrest Warrant Against Sheikh Hasina

Arrest Warrant Against Sheikh Hasina | राजकीय पदाचा गैरवापर करून बेकायदेशीररीत्या भूखंड (Bangladesh Land Scam) मिळवल्याच्या आरोपांवरून बांगलादेशातील न्यायालयाने माजी पंतप्रधान शेख हसीना (Sheikh Hasina), त्यांच्या बहिणी शेख रेहाना (Sheikh Rehana), ब्रिटिश खासदार ट्यूलिप रिझवाना सिद्दीकयांच्यासह एकूण 53 जणांविरोधात अटक वॉरंट जारी केले आहे.

रिपोर्टनुसार, ढाकामधील वरिष्ठ विशेष न्यायाधीश झाकीर हुसेन यांनी लाचलुचपत प्रतिबंधक आयोग (ACC) दाखल केलेल्या तीन स्वतंत्र आरोपपत्रांवर विचार केल्यानंतर हा आदेश दिला. अटक वॉरंट (Sheikh Hasina Arrest Warrant) अंमलबजावणीचा अहवाल 27 एप्रिल रोजी सादर करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले असून, ही माहिती ACC चे सहाय्यक संचालक अमीनुल इस्लाम यांच्या हवाल्याने देण्यात आली आहे.

भूखंड वाटपातील भ्रष्टाचारप्रकरणी ACC ने अलीकडेच 53 जणांविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. सर्व आरोपी फरार असल्याने अटक वॉरंट जारी करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

याआधी, 10 एप्रिल रोजी राजुक भूखंड वाटप घोटाळ्यात शेख हसीना, त्यांची मुलगी सायमा वाजेद पुतुल (Saima Wazed Putul) आणि इतर 17 जणांविरुद्ध देखील अटक वॉरंट काढण्यात आले होते. सायमा पुतुल 1 नोव्हेंबर 2023 पासून जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) दक्षिण-पूर्व आशियाई प्रादेशिक संचालकपदी कार्यरत आहेत.

13 जानेवारी रोजी, ACC ने शेख रेहाना यांच्याविरोधात पूर्बाचल न्यू टाउन प्रकल्पात भूखंड बेकायदेशीररीत्या खरेदी केल्याचा गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात हसीना, रेहाना, ट्यूलिप सिद्दीक आणि इतर मिळून एकूण 15 जण आरोपी आहेत. तपासाअंती 10 मार्च रोजी दाखल केलेल्या आरोपपत्रात दोन नव्या नावांची भर घालून एकूण 17 आरोपी दाखल करण्यात आले.

दुसऱ्या प्रकरणात, भूखंड खरेदीत भ्रष्टाचार केल्याप्रकरणी अझमिना सिद्दीक यांच्यावरही आरोपपत्र दाखल झाले असून, सुरुवातीच्या तक्रारीत हसीना, ट्यूलिप यांच्यासह 16 जणांचा समावेश होता. अंतिम आरोपपत्रात ही संख्या 18 वर गेली.

ACC ने याच दिवशी दाखल केलेल्या तिसऱ्या खटल्यात शेख रेहाना यांचा मुलगा राडवान मुजीब सिद्दीक (Radwan Mujib Siddiq) यांच्यावरही राजकीय दबावाचा वापर करून भूखंड मिळवल्याचा आरोप केला आहे.

दरम्यान, शेख हसीना यांच्याविरोधात बांगलादेशच्या आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणात अजूनही सामूहिक हत्या, मानवता विरोधी गुन्हे, सक्तीचे बेपत्ता करणे अशा गंभीर आरोपांची खटले सुरू आहेत.

5 ऑगस्ट 2024 रोजी विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखालील हिंसक जनआंदोलनात अवामी लीग सरकार (Bangladesh Political Crisis) उलथवले गेले. तेव्हापासून 77 वर्षीय शेख हसीना भारतात वास्तव्यास आहेत.