नवी दिल्ली
एस्सेल समूहाचे अध्यक्ष सुभाष चंद्रा आणि आणि झी एंटरटेन्मेंट एंटरप्रायझेस लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी पुनित गोयंका यांना सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाने (सेबी) दिलेल्या निर्देशांविरुद्ध तात्काळ दिलासा देण्यास कंपनी अपिलीय न्यायाधिकरणाने (सॅट) नकार दिला. सॅटने सेबीला चंद्रा आणि गोयंका यांच्या अपिलांवर ४८ तासांत उत्तर दाखल करण्यास सांगितले आहे. ‘सॅट’ने हे प्रकरण निकाली काढण्यासाठी १९ जून ही तारीख निश्चित केली आहे.
गुरुवारी दिलेल्या आदेशात सॅटने म्हटले की, ‘या टप्प्यावर अंतरिम आदेश देणे म्हणजे अपील मान्य करणे होय. परिणामी, आम्हाला वाटते की अपिलांवर शेवटी निर्णय घ्यावा. बाजार नियामक सेबीने १२ जून रोजी चंद्रा आणि गोएंका यांच्यावर झेडइइएलच्या निधीचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी कारवाई केली होती. यानंतर त्यांनी सेबीच्या आदेशाला सॅटमध्ये आव्हान दिले आहे.