भारतीय शहरांमधील वाहतूक समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. वाढती लोकसंख्या, अपुरी रस्त्यांची सुविधा आणि वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे वाहतुकीची कोंडी ही मोठी समस्या बनली आहे. नागरिक तासंतास वाहतूक कोंडीत अडकल्याचे पाहायला मिळते. यामुळे महत्त्वाचा वेळ तर वाया जातोच, सोबतच शारीरिक व मानसिक ताण देखील सहन करावा लागतो. टॉम्स ट्रॅफिक इंडेक्स 2024 समार आला असून, यात जगातील सर्वाधिक वाहतूक कोंडी व सर्वात कमी वाहतुकीचा वेग असलेल्या टॉप-5 शहरांमध्ये भारतातील 3 शहरे आहेत. यामध्ये महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहराचाही समावेश आहे.
वर्ष 2024 ची टॉमटॉम रँकिंग जाहीर झाली असून, यात जगभरातील वाहतूक परिस्थितीचा आढावा घेण्यात आला आहे. या रँकिंगमध्ये 6 खंडांतील 62 देशांमधील 500 शहरांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये सरासरी प्रवासाचा वेळ, ट्रॅफिक जाम यांसारख्या विविध निकषांवर वाहतुकीचे मूल्यमापन करण्यात आले. विशेष म्हणजे या यादीत पहिल्या पाच शहरांपैकी तीन शहरं भारतातील आहेत.
कोलंबियामधील बॅरँक्विला हे शहर या यादीमध्ये सर्वात पुढे आहे. या शहरात 10 किमी अंतर पार करण्यासाठी 36 मिनिटं 6 सेकंद लागतात. त्यापाठोपाठ दुसऱ्या क्रमांकावर कोलकाता शहर आहे. येथे 10 किमी अंतर पार करण्यासाठी वाहनाने 34 मिनिटं 33 सेकंद लागतात.
त्यापाठोपाठ बंगळुरू आणि पुण्याचा क्रमांक आहे. या शहरांमध्ये एवढेच अंतर पार करण्यासाठी अनुक्रमे 34 मिनिटं 10 सेकंद आणि 33 मिनिटं 22 सेकंद लागतात. तर 5व्या क्रमांकावर ब्रिटनमधील लंडन हे शहर आहे. येथे 10 किमीसाठी यूकेमध्ये सरासरी प्रवासाचा वेळ 33 मिनिटं 17 सेकंद आहे.