विशाखापट्टणम- विशाखापट्टणम क्रिकेट स्टेडियममध्ये आज झालेल्या आयपीएलच्या अटीतटीच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनौ सुपर जायंट्सवर 3 चेंडू आणि 1 गडी राखत दणदणीत विजय मिळवला. निकोलस पूरन आणि मिशेल मार्श यांच्या स्फोटक अर्धशतकांच्या जोरावर लखनौने दिल्लीसमोर 210 धावांचे लक्ष्य ठेवले. मात्र या धावसंख्येचा पाठलाग करताना दिल्लीच्या वरच्या फळीतील फलंदाज झटपट माघारी परतले. त्यानंतर आशुतोष शर्मा (31 चेंडूत 66 धावा) आणि विप्रज निगम (15 चेंडूत 39 धावा) यांनी जोरदार फटकेबाजी केल्यामुळे दिल्लीने विजयी
लक्ष्य गाठले.
नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी केल्यानंतर लखनौने निर्धारित षटकांत 8 गडी गमावून 209 धावा केल्या. लखनौकडून मिचेल मार्शने 36 चेंडूंत 72 धावा केल्या. तर निकोलस पूरनने 30 चेंडूंत 75 धावांची शानदार खेळी केली. लखनौने दिलेल्या 209 धावसंख्येचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सची सुरुवात खराब झाली. 7 धावांच्या आत जेक फ्रेझर-मॅकगर्क, अबीशेक पोरेल आणि समीर रिझवी हे फलंदाज झटपट बाद झाले. त्यांनी अनुक्रमे 1, 0 आणि 4 धावा केल्याने दिल्लीचा डाव संकटात आला. सलामीवीर फाफ डु प्लेसिस आणि कर्णधार अक्षर पटेल यांनी फटकेबाजी करून संघाच्या धावसंख्येला गती देण्याचा प्रयत्न सुरू केला. मात्र अक्षर पटेल मोठा फटका मारण्याच्या नादात बाद झाला. त्याने 3 चौकार आणि 1 षटकारासह 11 चेंडूंत 22 धावा केल्या. त्याच्यापाठोपाठ अनुभवी फाफ डु प्लेसिस (18 चेंडूंत 29 धावा) माघारी परतला. तो रवी बिश्नोईच्या गोलंदाजीवर मिलरकडे झेलबाद झाला. परिमाणी दिल्लीची अवस्था 6.5 षटकांत 5 बाद 65 धावा झाली होती. वरच्या फळीत फलंदाज झटपट बाद झाल्याने दिल्लीचा संघ पराभवाच्या छायेत आला. अशा कठीण परिस्थितीत ट्रिस्टन स्टब्स आणि आशुतोष शर्मा यांनी डाव सावरला. मात्र विजयासाठी दिल्लीला शेवटच्या 60 षटकांत 121 धावांची गरज होती. ट्रिस्टन स्टब्स 22 चेंडूंत 34 धावा करून बाद झाला. दुसऱ्या बाजूने आशुतोषची फटकेबाजी सुरू होती. त्याला विप्रजने चांगली साथ दिली. निगमने 15 चेंडूंत 39 धावा करून बाद झाल्यानंतर मिचेल स्टार्क (2) आणि कुलदीप यादव (5) हे देखील माघारी परतले. त्यावेळी दिल्लीला 6 चेंडूंत 6 धावांची विजयासाठी आवश्यकता होती. मात्र दिल्लीचा 1 गडी बाकी होता. तिसऱ्या चेंडूवर षटकार ठोकत आशुतोषने संघाला विजय मिळवून दिला.
