आसाम सरकार १० वी आणि १२ वीचे बोर्ड विलीन करणार

दिसपूर- आसाम सरकारने माध्यमिक शिक्षणाच्या व्यवस्थापनासाठी १० वी आणि १२ वीचे राज्य मंडळांचे बोर्ड विलीन करून नवीन बोर्ड तयार करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. याबाबत सरकारने विधानसभेत आसाम राज्य शालेय शिक्षण मंडळ विधेयक २०२४ सादर केले. या विधेयकानुसार माध्यमिक शिक्षण मंडळ आसाम आणि आसाम उच्च माध्यमिक शिक्षण परिषद यांचे विलीनीकरण करून नवीन मंडळ आसाम राज्य शाळा शिक्षण मंडळ तयार केले जाईल.
राज्यातील माध्यमिक शिक्षणाचे नियमन, पर्यवेक्षण आणि विकास करण्यासाठी हा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. यानुसार आसाम माध्यमिक शिक्षण मंडळ आणि आसाम उच्च माध्यमिक शिक्षण परिषद यांचे विलीनीकरण केले जाईल. ‘आसाम राज्य शाळा शिक्षण मंडळ’ याचे नेतृत्व सरकारने नामनिर्देशित केलेल्या अध्यक्षाकडे दिले जाणार आहे. त्यांच्या अधिपत्याखालील प्रत्येक प्रभागासाठी एक उपाध्यक्ष असेल. उपाध्यक्ष प्रत्येक प्रभागाची काळजी घेतील. त्यांची नियुक्ती देखील सरकार करणार आहे. नवीन मंडळात २१ सदस्य असतील. ज्यांचा कार्यकाळ ३ वर्षांचा असेल. कार्यकाळ संपल्यानंतर त्याच कालावधीसाठी त्यांचे नूतनीकरण केले जाण्याची शक्यता आहे. दर्मायन, गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये मुख्यमंत्री हिमंता विश्व शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता. सध्या, माध्यमिक शिक्षण मंडळ आसाम राज्यात दहावीची बोर्ड परीक्षा घेते. १२ वीची परीक्षा आसाम उच्च माध्यमिक शिक्षण परिषदेद्वारे घेतली जाते.
आसाम सरकारने काल सोनितपूर आणि कोक्राझार जिल्ह्यात दोन नवीन सरकारी विद्यापीठे तयार करण्याचा प्रस्ताव दिला. या संदर्भात दोन विधेयके सादर करताना, सरकारने सोनितपूर जिल्ह्यातील गोहपूर येथे स्वाहिद कनकलता बरुआ राज्य विद्यापीठ आणि कोक्राझार येथे कोक्राझार विद्यापीठ स्थापन करण्याची योजना असल्याचे सांगितले. विद्यापीठांतर्गत मुक्त आणि दूरस्थ शिक्षण केंद्रही बांधले जाणार आहे. उच्च शिक्षण विभागाच्या मते, आसाममध्ये एकूण २२ विद्यापीठे आहेत, त्यापैकी १४ राज्य सरकार चालवतात. २ केंद्रीय आणि ६ खासगी विद्यापीठे आहेत.