‘पंतप्रधानांची स्तुती केली तर लोकं तुम्हाला…’ प्रीती झिंटा ट्विट करत नेमकं काय म्हणाली? सोशल मीडियावर जोरदार चर्चा

Preity Zinta : अभिनेत्री प्रीती झिंटा सध्या अभिनयापासून लांब आहे. ती सोशल मीडियावर देखील फारशी सक्रीय नसते. मात्र, सध्या तिने केलेल्या एका ट्विटची जोरदार चर्चा रंगली आहे. प्रीतीने पंतप्रधान मोदींचा उल्लेख करत एक ट्विट केले आहे. त्यामुळे ती चर्चेत आली आहे.

प्रीतीने ऑनलाइन ट्रोलिंग आणि सोशल मीडियावरील नकारात्मक वातावरणावर भाष्य केले. लोक सेलिब्रिटींच्या सोशल मीडिया सक्रियतेकडे पाहून लवकरच त्यांच्याबद्दल मत तयार करतात. तसेच, तुम्ही पंतप्रधानांची स्तुती केली तर तुम्हाला ‘भक्त’ ठरवले जाते., असे तिने म्हटले आहे.

प्रीती झिंटाने एक्सवर (ट्विटर) लिहिले की, आजकाल सोशल मीडियावर नेमकं चाललंय तरी काय? जर कोणी एआय बॉटसोबत पहिल्यांदा चॅट केलं तर लोकांना वाटतं की हे पेड प्रमोशन आहे. जर तुम्ही पंतप्रधानांची स्तुती केली तर तुम्हाला भक्त म्हटलं जातं आणि जर तुम्ही अभिमानाने हिंदू किंवा भारतीय असल्याचं सांगितलं तर तुम्हाला अंधभक्त म्हणण्यात येतं.

लोक जसे आहेत तसे त्यांना स्वीकारा, त्यांना आपल्या विचारानुसार बदलण्याचा प्रयत्न करू नका. आपल्याला फक्त शांत आणि निर्धास्त राहण्याची गरज आहे, आनंदाने आणि प्रेमाने एकमेकांशी संवाद साधा, असेही ती म्हणाली.

तिने जीन गुडइनफसोबत लग्न करण्याबाबत सांगितले की, ‘आता मला हे विचारू नका की मी जीनसोबत लग्न का केले? मी लग्न केले कारण मी त्याच्यावर प्रेम करते, कारण सीमेवर असा एक व्यक्ती आहे जो माझ्यासाठी आपले प्राण देऊ शकतो.’

दरम्यान, प्रीती झिंटा लवकरच नवीन चित्रपटासह प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तिचा लाहोर 1947 हा सिनेमा लवकरच मोठ्या पडद्यावर रिलीज होणार आहे.