संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 29 January 2023

कोरोनाविरोधात लढण्यासाठी उच्च रक्तदाबापासून स्वतःला दूर ठेवा

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – १७ मे हा दिवस जागतिक उच्च रक्तदाब दिन म्हणून साजरा केला जातो. धावपळीच्या युगात अनेकांना कधी ना कधी हा रक्तदाबाचा त्रास जाणवतो. परंतु, आता कोरोनाचं सावट सर्वत्र पसरलेलं असताना या आजाराशी लढायचं असले तर शरीराच्या उच्च रक्तदाबाकडे अधिक लक्ष देणं गरजेचं आहे. याचं कारण म्हणजे हा आजार अन्य गंभीर आजारांना आमंत्रण देऊ शकतो. मात्र, उच्च रक्तदाबाबत अनेकांना मनात गैरसमज आहेत. त्यामुळे उच्च रक्तदाबावर नियंत्रण मिळवायचं असेल तर या आजाराबाबतचे समज व गैरसमज माहिती करून घेणं गरजेचं आहे. याबाबत अधिक माहिती देत आहेत कोहिनूर रुग्णालयाचे डॉ.विश्वनाथ अय्यर.

तज्ज्ञ डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, रक्तवाहिन्यांमधून रक्त प्रवाह सुरू राहण्यासाठी लागणारा दाब म्हणजे रक्तदाब. या आजाराला सायलेंट किलर असेही संबोधले जाते. आपल्या शरीरात रक्तसंचार करण्यासाठी दबावाची आवश्यकता असते. हा दबाव ह्रदयाच्या नियमित होणाऱ्या स्पंदनामुळे उपलब्ध होतो. उच्च रक्तदाब ही तक्रार आजच्या धावपळीच्या जीवनशैलीची सामान्य बाब होऊ पाहते आहे. सर्वसाधारणपणे १२० ते १३० ही रक्तदाबाची वरची पातळी सामान्य मानली जाते. तर ८० ते ९० ही खालची पातळी सामान्य रक्तदाबामध्ये मोजली जाते.

उच्च रक्तदाबाबद्दल समज आणि गैरसमज 
१) उच्च रक्तदाब सामान्य आहे आणि जास्त चिंता करण्याचे कारण नाही
तथ्य – उच्च रक्तदाब ही अशी गंभीर स्थिती असून याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. उच्च रक्तदाब नियंत्रणात न राहिल्यास मूत्रपिंड, हृदय, रक्तवाहिन्यांना नुकसान करू शकतो आणि अचानक हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोक देखील होऊ शकतो. हायपरटेन्शनला बर्‍याचदा ‘सायलेंट किलर’ म्हणून संबोधले जाते. कारण बर्‍याचदा या आजाराची लक्षणे दिसून येत नाहीत.

२) उच्च रक्तदाब रोखणे शक्य नाही*
तथ्य – उच्च रक्तदाबासाठी अद्याप कोणताही इलाज नाही. परंतु, आवश्यक ती काळजी घेतल्यास रक्तदाब नियंत्रणात ठेवता येऊ शकतो.

३) महिलांच्या तुलनेत पुरूषांमध्ये उच्च रक्तदाबाचा त्रास अधिक दिसून येतो

तथ्य – धावपळीच्या युगात अनेकांना उच्च रक्तदाबाचा त्रास जाणवतोय. हल्लीच्या काळात गरोदर महिलांमध्ये उच्च रक्तदाबाचं प्रमाण वाढत आहे. त्यामुळे गर्भाची वाढ मंदावणं, अकाली प्रसूती, गर्भपात, मृतावस्थेत बाळाचा जन्म असे धोके असतात. गरोदरपणात रक्तदाबाचा त्रास का वाढतो, याची कारण अद्याप समजू शकलेली नाहीत. याशिवाय रजोनिवृत्तीनंतर स्त्रियांना उच्च रक्तदाबाचा धोका जास्त असतो.

४) उच्च रक्तदाब हा एक अनुवांशिक आजार आहे?
तथ्य – उच्च रक्तदाब हा आजार कधीही कोणत्याही व्यक्तीला होऊ शकतो. बदलत्या जीवनशैलीमुळे तरुणांमध्ये हा आजार जास्त दिसून येत आहे. परंतु, कुटुंबात एखाद्याला हा आजार असल्यानं पुढच्या पिढीला हा आजार होण्याचा धोका वाढतो. तथापि निरोगी जीवनशैलीतील बदलांमुळे उच्च रक्तदाब होण्यास विलंब किंवा टाळण्यास मदत होऊ शकते.

५) उच्च रक्तदाबावर नियंत्रण मिळवण्यासाठी काय करावे?
उच्च रक्तदाबाचा त्रास टाळण्यासाठी जेवणात मीठाचा वापर कमी करावा, फळे, भाज्या, नियमित व्यायाम आणि ध्यान करावे.

६) रक्तदाब सामान्य असल्यास नियमित औषध घेण्याची गरज नसते का?
उच्च रक्तदाबाचा त्रास असणाऱ्या रूग्णांवर डॉक्टरांच्या देखरेखीखाली औषधोपचार सुरू असतो. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधं बंद करणे चुकीचे आहे. नियमित औषधांचे सेवन न केल्यास रक्तदाब वाढल्याने हृदय, मेंदू आणि मूत्रपिंडासारख्या शरीरातील अन्य अवयवांवर विपरित परिणाम होऊ शकतो. म्हणून रक्तदाब नियंत्रणात असला तरी औषधोपचार बंद करू नयेत.

उच्च रक्तदाबाचा त्रास असलेल्यांनी काय काळजी घ्यावी –
• वजन वाढू नये, यासाठी नियमित व्यायाम आणि योगाभ्यास करा
• व्यायामामुळे मनावरील ताण कमी होत असल्याने उच्च रक्तदाबाचा त्रास कमी होऊ शकतो.
• उच्च रक्तदाबाग्रस्त रूग्णांनी आहारात मिठाचे प्रमाण कमी ठेवावे
• रोजच्या जेवणात ताज्या भाज्या, फळे आणि दुग्धजन्य पदार्थांचा समावेश करावा
• जंकफूड आणि मसालेदार पदार्थांचे सेवन शक्यतो टाळावेत
• धुम्रपान आणि मदयपान करू नयेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Close Bitnami banner
Bitnami