संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 09 February 2023

दिनविशेष! असा लागला एटीएमचा शोध, कहाणी आहे रंजक

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

आज ए.टी.एम.(ऑटॉमेटेड टेलर मशिन)चे जनक जॉन शेफर्ड-बॅरन यांचा स्मृतीदिन. त्यांचा जन्म 2३ जून १९२५ रोजी शिलॉँग मेघालय येथे.
जॉन शेफर्ड-बॅरन यांचे वडील स्कॉटीश होते, त्याचं नाव विलफ्रिड बॅरन होते. जॉन यांच्या जन्मावेळी ते चितगाव पोर्टचे चीफ इंजिनीअर होते. त्यांची आई डोरोथी, ऑलिंपिक टेनिस खेळाडू होत्या आणि विंबल्डन महिला टेनिस दुहेरीच्या विजेत्या होत्या. मात्र जन्मानंतर जॉन शेफर्ड बॅरॉन हे फार काळ भारतात राहिले नाहीत. पालकांसोबत लंडनला परतले. त्यांचे शालेय व महाविद्यालयीन शिक्षण इंग्लडमध्ये झाले. केंब्रिज विद्यापीठातून पदवी संपादन केल्यावर ते एका खासगी कंपनीत नोकरीला लागले.
एटीएम मशीनची कल्पना जॉन शेफर्ड-बॅरन यांना कशी सुचली यामागे देखील एक रंजक कहाणी आहे.
ते आठवडय़ातून एकदा पैसे काढण्यासाठी बँकेत जात असत. दर शनिवारी ते बँकेत जाऊन पैसे काढण्याचे काम करीत. जॉन शेफर्ड असेच एका शनिवारी पैसे काढायला जाणार होते. त्यापूर्वी आंघोळीला गेले आणि टब बाथमध्ये एवढे रमले की त्यांना बँकेत लवकर पोहोचायचे भानच राहिले नाही. बँकेत पोहोचेपर्यंत बँक बंद झाली होती. बँकेच्या वेळेव्यतिरिक्त ग्राहकाला कधीही पैसे काढता आले पाहिजेत, या विचाराने त्यांना घेरले. पैसे काढता येणारे मशिन असावे अशी कल्पना सुचली. त्याकाळी पैसे टाकून चॉकलेट घेण्यासाठी मशिन होते. तसेच मशिन पैसे काढण्यासाठी तयार करावे, अशी त्यांच्या डोक्यात कल्पना आली आणि ते कामाला लागले. १९६७ साली त्यांनी ए.टी.एम. मशिनमध्ये एक विशिष्ट चेक सरकवून पैसे काढण्याची सोय सुरू केली. कालांतराने यात सुधारणा होत गेली. ए.टी.एम.मध्ये प्लॅस्टिक कार्ड सरकवून पैसे काढण्याची सोय झाली आणि बँकिंग उद्योगासाठी हे तंत्रज्ञान म्हणजे एक वरदानच ठरले. जॉन शेफर्ड यांनी सुरुवातीच्या काळात ए.टी.एम. मशिनमधून पैसे काढण्यासाठी सहा आकडी क्रमांक ठेवला होता. कालांतराने हा क्रमांक खूप मोठा होतो असे वाटले आणि त्यांनी चार आकडी पिन क्रमांक सुरू केला. अशा प्रकारे त्यांनी सुरुवातीला तयार केलेल्या ए.टी.एम.मशिनमध्ये वेळोवेळी आवश्यकतेनुसार बदल केले. सुरुवातीच्या काळात त्यांनी तयार केलेल्या ए.टी.एम.मशिनमधून कमीतकमी १० पौंड काढता येत. आता ग्राहकाच्या आवश्यकतेनुसार पैसे काढण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. ए.टी.एम. ही संकल्पना आत ग्राहकांच्या मनात चांगलीच रुजली असून अत्यंत लोकप्रिय झाली आहे. मात्र जॉन शेफर्ड यांनी लावलेल्या या मशिनच्या शोधापूर्वी १९३९ साली सिटी बँक ऑफ न्यूयॉर्कने अशाच प्रकारचे मशिन बसविले होते. परंतु ग्राहकांच्या प्रतिसादाअभावी बँकेने ते बंद केले होते. म्हणूनच जॉन शेफर्ड हेच जगाच्या आणि जागतिक बँकिंग व्यवसायाच्या दृष्टीने ए.टी.एम. मशिनचे जनक ठरले. जॉन शेफर्ड यांच्या पत्नी कॅरोलिन मरे या रॉयल बँक ऑफ स्कॉटलंडच्या अध्यक्षांच्या कन्या होत्या. त्यांना बँकिंग विषयाची फार आवड होती. या आवडीतून त्यांनी ए.टी.एम. मशिनसंबंधी आपल्या पतीला वेळोवेळी सूचना केल्या. जगात सर्वात आधी एटीएम मशीनचा वापर २७ जून १९६७ ला बार्कलेज बँकेने केला होता. ही पहिली एटीएम मशीन लंडनच्या बार्कलेज बँकेच्या शाखेत लावण्यात आली. भारतात सर्वात पहिली एटीएम मशीन १९८७ मध्ये लावली गेली. हे पहिले एटीएम हाँगकाँग अॅण्ड शांघाई बँकिंग कॉर्पोरेशन (HSBC)ने मुंबईत लावले होते. आज जगभरात २५ लाखाहून जास्त ए.टी.एम. मशिन्स आहेत. जॉन शेफर्ड यांना त्यांनी लावलेल्या या शोधाबद्दल अनेक पुरस्कार मिळाले. ब्रिटनच्या राणीने त्यांचा केलेला सत्कार हा विशेष उल्लेखनीय होता. भविष्यात ग्राहकाच्या गरजांनुसार ए.टी.एम. मशिनमध्ये कितीही बदल झाले तरी त्याचा शोध लावणारे म्हणून जॉन शेफर्ड यांचे नाव इतिहासात नोंदले गेले आहे. जॉन शेफर्ड-बॅरन यांचे निधन १५ मे २०१० रोजी झाले.
संजीव वेलणकर, पुणे
९४२२३०१७३३

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Close Bitnami banner
Bitnami