भाईंदर- मिरा-भाईंदर शहरात महापालिकेच्या मराठी,हिंदी आणि गुजराती माध्यमाच्या एकूण ३६ शाळा आहेत. येत्या शैक्षणिक वर्षापासुन या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांच्या गणवेशात बदल केला जाणार आहे.खासगी शाळांप्रमाणे या शाळांचाही शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी नवनवीन उपाययोजना आखण्यात आल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून या शाळेतील विद्यार्थ्यांना आता आकर्षक दिसणारा गणवेश दिला जाणार आहे,अशी माहिती पालिका आयुक्त दिलीप ढोले यांनी दिली.
ढोले यांनी सांगितले की, यंदा महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांच्या रंग बदलला जाणार आहे. यामध्ये आता पिवळा चेक्स शर्ट आणि ब्ल्यू पँट व टाय असा गणवेश असणार आहे. खासगी शाळांप्रमाणे या महापालिकेच्या विद्यार्थ्यांना शिक्षण आणि अन्य सोयीसुविधा देण्याचा पालिका प्रयत्न करणार आहे.आतापर्यंत अनेक पालिका शाळांमध्ये सेमी इंग्रजीचे वर्गही सुरू करण्यात आले आहेत. डिजिटल वर्ग, शाळांची रंगरंगोटी आणि इतर उपाययोजना केल्या जाणार आहेत.पालिका शाळेतील विद्यार्थ्यांची गळती भरून काढण्यावर पालिका आता भर देणार आहे.