Pan Card Scam : तुम्हालाही आला का पॅन कार्डशी संबंधित ‘हा’ मेसेज? होऊ शकते मोठी आर्थिक फसवणूक

Pan Card Scam : सायबर गुन्हेगार नागरिकांची फसवणूक करण्यासाठी नवनवीन पद्धतीचा वापर करत आहेत. सध्या पॅन कार्डशी संबंधित असाच एक स्कॅम समोर आला आहे. प्रामुख्याने इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेच्या (India Post Payments Bank) ग्राहकांची याद्वारे फसवणूक केली जात आहे.

सध्या पॅन कार्ड (Pan Card Scam) हे कोणत्याही आर्थिक व्यवहारासाठी महत्त्वाचे कागदपत्रं आहे. मात्र, पॅन कार्डशी संबंधित एक मेसेज सध्या व्हायरल होत आहे. यामध्ये इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेच्या (India Post Payments Bank) ग्राहकांना पॅनची माहिती अपडेट करण्यास सांगितले जाते. अन्यथा खाते बंद केले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे. यावर आता प्रेस इन्फॉर्मेशन ब्यूरोने माहिती देत हा मेसेज बनावट असल्याचे स्पष्ट केले आहे.

व्हायरल होणार नक्की मेसेज काय?

इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकच्या (India Post Payments Bank) ग्राहकांशी संबंधित एक बनावट पोस्ट सध्या व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये ग्राहकांना 24 तासांच्या आत बँक खात्याशी पॅनची माहिती अपडेट करण्यास सांगितले जात आहे. तसेच, माहिती अपडेट न केल्यास खाते बंद केले जाईल, असा इशारा मेसेजमध्ये देण्यात आला आहे. याबाबत PIB ने माहिती दिली आहे. इंडिया पोस्ट ऑफिसकडून असा कोणत्याही प्रकारचा मेसेज पाठवण्यात आलेला नाही. तसेच, हा मेसेज खोटा असून, ग्राहकांनी घाबरून जाऊ नये.

पीआयबीने खातेधारकांना सावध करत सांगितले की, कोणालाही वैयक्तिक व बँकेशी संबंधित माहिती शेअर करू नये. तसेच, अशा मेसेजमधील कोणत्याही बनावट लिंकवर क्लिक करू नये.  खाते बंद होईल असा मेसेज आल्यास त्यावर विश्वास ठेऊ नये. कारण, हे मेसेज खोटे आहेत.

अशाप्रकारच्या फसवणुकीपासून कसे वाचाल?

अशाप्रकारचे मेसेज अनेकदा खरे असल्यासारखे वाटतात. मात्र, याद्वारे तुमची मोठी आर्थिक फसवणूक होऊ शकते. या मेसेजच्या माध्यमातून तुमच्या बँक खात्याची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला जातो. अशा मेसेजमध्ये प्रामुख्याने बँकेच्या (India Post Payments Bank) नावाचा वापर केला जातो. याशिवाय, तुमच्या पॅन, आधार किंवा बँक खात्याची माहिती कधीही अनोळखी व्यक्तीला शेअर करू नये. तसेच, तुमच्या नकळत खात्यातून व्यवहार झाल्यास, त्वरित याबाबत बँकेला माहिती द्या.