SEBI: सोशल मीडियाच्या माध्यमातून आर्थिक गुंतवणुकीचा सल्ला देणाऱ्या फिनफ्लुएन्सर्सला सेबीने (SEBI) दणका दिला आहे. सेबीने नवीन परिपत्रक जारी करत शिक्षणाच्या नावाखाली कोणत्याही प्रकारच्या आर्थिक गुंतवणुकीचा सल्ला देण्यावर बंदी घातली आहे. तसेच, असे केल्यास कारवाई देखील केली जाणार आहे.
सेबीच्या परिपत्रकानुसार, आता फिनफ्लुएन्सर्सला (Finfluencers) शिक्षणाच्या नावाखाली रियल-टाइम मार्केट डेटाचा वापर करून आर्थिक गुंतवणुकीचा सल्ला देता येणार नाही. तसेच, त्यांना अशा प्रकारच्या डेटाचा वापर करण्यास मनाई करण्यात आली आहे. फिनफ्लुएन्सर्स तीन महिन्यांआधीच्या डेटाचा वापर करून इतरांना शेअर बाजाराविषयी माहिती देऊ शकतात.
फिनफ्लुएन्सर्ससाठी सेबीचे नवीन नियम काय आहेत?
- नोंदणी नसलेल्या फिनफ्लुएन्सर्सला कोणत्याही प्रकारचा गुंतवणूक सल्ला देण्यास मनाई करण्यात आली आहे.
- लोकांना आमिष दाखवणारे किंवा फसवणूक करणारी आश्वासने देऊ नयेत.
- स्टॉकब्रोकर, एक्सचेंज आणि फाइनेंशियल फर्म्स अशा कोणत्याही व्यक्तीशी जोडले जाऊ शकत नाहीत, जे या नियमांचे उल्लंघन करत आहेत.
- शेअर बाजाराविषयी इतरांना शिकवू शकता, मात्र त्या नावाखाली ट्रेडिंग टिप्स अथवा भविष्यातील अंदाज व्यक्त करता येणार नाही.
- सेबी नोंदणीकृत संस्थेला अशाप्रकारच्या फिनफ्लुएन्सर्ससोबत काम करण्यास मनाई करण्यात आली आहे.
- फिनफ्लुएन्सर्स शैक्षणिक अभ्यासक्रमात तीन महिन्यांपर्यंतच्या डेटाचा वापर करू शकणार नाही. तसेच, एखाद्या कंपनी अथवा शेअरचे नाव, कोड व्हिडिओ, टिकरमध्ये वापरता येणार नाही.
- नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर कारवाई केली जाऊ शकते. त्यांना दंड आकारला जाऊ शकतो. तसेच, त्यांचा परवाना देखील रद्द केला जाईल.