लाडकी बहीण योजनेंतर्गत महिलांना 21000 कोटी रुपये दिले, राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांची माहिती

Ladki Bahini Yojana : महाराष्ट्र सरकारद्वारे राज्यात लाडकी बहीण योजनेंतर्गत महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जात आहेत. लवकरच ही रक्कम वाढवून 2100 रुपये केली जाणार आहे. या योजनेंतर्गत आतापर्यंत महिलांना 21000 कोटी रुपये देण्यात आले असल्याची माहिती राज्यपाल सीपी राधाकृष्णन (C. P. Radhakrishnan) यांनी दिली.

प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आयोजित बोलताना राज्यपालांनी ही माहिती दिली. लाडकी बहीण योजनेंतर्गत जुलै 2024 ते डिसेंबर 2024 या कालावधीत 2.46 कोटी महिलांना 21000 रुपये देण्यात आल्याचे सीपी राधाकृष्णन यांनी सांगितले. महिलांच्या आर्थिक स्वायत्ततेसाठी, आरोग्य सुधारण्यासाठी आणि निर्णय घेण्याच्या भूमिकेत सहभागी होण्यासाठी ही योजना फायद्याची ठरत आहे.

कापूस व सोयाबीन उत्पादन करणाऱ्या राज्यातील 68 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 2800 कोटी रुपयांपेक्षा अधिकची रक्कम जमा करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

 एफडीआयमध्येही महाराष्ट्र अग्रेसर असल्याची माहिती राज्यपालांनी दिली. एफडीआय आकर्षित करण्यात महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर असून, ही अतिशय अभिमानाची बाब असल्याचे राज्यपाल म्हणाले. सरकारी कामे लवकर व्हावीत यासाठी एआयचा वापर केला जात आहे.  गुन्हे रोखण्यासाठी ‘महापे’ येथे सायबर सुरक्षा प्रकल्प सुरू करण्यात आला असून, यामुळे पोलिसांना गुन्ह्यांच्या तपासात मदत होईल, असे ते म्हणाले.