Unified Pension Scheme : केंद्र सरकारने यूनिफाईड पेन्शन योजना (UPS) लागू करण्यासंदर्भातची अधिसूचना जारी केली आहे. ही योजना 1 एप्रिल 2025 पासून लाग करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ऑगस्ट 2024 मध्ये सरकारकडून या योजनेची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर हा याची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. काही दिवसांनी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. त्यापूर्वीच सरकारने हा निर्णय घेत केंद्रीय कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी दिली आहे.
जवळपास 23 लाख सरकारी कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. कर्मचाऱ्यांकडून एनपीएसला विरोध करण्यात आला होता. त्यानंतर सरकारकडून ही योजना जुनी पेन्शन योजना (OPS) आणि राष्ट्रीय पेन्शन प्रणाली (NPS) यांचे काही फायदे एकत्र करून ही योजना मांडण्यात आली. यूनिफाईड पेन्शन योजनेचे उद्दिष्ट कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर निश्चित पेन्शन देऊन त्यांना आर्थिक स्थिरता प्रदान करणे हा आहे.
यूनिफाईड पेन्शन योजनेची वैशिष्ट्ये (Unified Pension Scheme)
यूनिफाईड पेन्शन योजनेंतर्गत 25 वर्ष सेवा बजावल्यानंतर निवृत्तीच्या आधीच्या 12 महिन्यांचे सरासरी मूळ वेतनाच्या 50 टक्के रक्कम पेन्शन स्वरुपात दिली जाईल. 10 वर्ष सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर दरमहा 10,000 रुपये पेन्शन दिली जाईल. महागाई निर्देशांकानुसार पेन्शनच्या रक्कमेतही वाढ होईल. याशिवाय, कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबाला पेन्शनच्या एकूण रक्कमेपैकी 60 टक्के रक्कम दिली जाईल.