संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 29 March 2023

दिनविशेष! जगातील सर्वशक्तिमान महासत्ता असलेल्या अमेरिकेचा आज २४२ वा स्वातंत्र्यदिन

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

१७७६ साली हा देश ब्रिटीशांच्या शासनातुन मुक्त झाला. २०० वर्षांपेक्षा जास्त काळ लोटुनही अजूनही इथे हा दिवस साजरा करण्याचा उत्साह टिकुन आहे. या दिवशी देशाला उद्देशुन राजकीय भाषणे, सार्वजनिक सुट्टी, परेड इथे केले जातात. पण त्याचबरोबर ह्या दिवशी इथल्या मोठमोठ्या शहरात होणारी आकर्षक आतिषबाजी हे मुख्य आकर्षण. देशाची राजधानी वॉशिंग्टन, तसेच मियामी, न्युयॉर्क ह्या शहरांमध्ये होणारी आतिषबाजी बघायला लोकं जगाच्या कानाकोपऱ्यातुन येतात. न्युयॉर्कमध्ये होणारी आतिषबाजी ही सर्वात मोठी आणि आकर्षक मानण्यात येते. १७७६ मध्ये आजच्या दिवशी अमेरिकन वसाहतींमधील प्रतिनिधी सभेने स्वातंत्र्याचा जाहीरनामा प्रसिद्ध केला व स्वत:ला ‘स्वतंत्र’ घोषित केले.

अमेरिकेच्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा : उत्तर अमेरिका खंडातील ब्रिटिश वसाहतींनी मायदेशाविरुद्ध युद्ध पुकारल्यानंतर आपले ध्येय व उद्दिष्ट जगाला समजावे आणि स्वतंत्र राष्ट्रांचे आपल्याला साहाय्य मिळावे, म्हणून वसाहतींच्या प्रतिनिधिसभेने ४ जुलै १७७६ रोजी स्वातंत्र्याचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. वसाहती व मायदेश यांच्यातील वाद विकोपाला जाऊन युद्ध सुरू झाल्यावरही वसाहतींनी ब्रिटनचे सार्वभौमत्व मान्य करावे, पण अंतर्गत व्यवहारात वसाहतींना स्वातंत्र्य असावे, अशी तडजोड घडवून आणण्याचे प्रयत्न झाले; तथापि उभय पक्षांतील जहालांच्या विरोधामुळे ते फसले. युद्ध सुरू होताच वसाहतींनी फ्रान्ससारख्या देशांची मदत मिळविण्याचे प्रयत्न सुरू केले. तेव्हा लढून यश मिळविल्यानंतरही वसाहती ब्रिटनची ताबेदारी स्वीकारणार असतील, तर फ्रान्स आदी देशांनी त्यांच्या भानगडीत का पडावे, असा प्रश्न त्या देशांतील मुत्सद्दी व राज्यकर्ते उपस्थित करू लागले. त्यांच्या समाधानकारक उत्तरासाठी निर्भेळ स्वातंत्र्याचा पुरस्कार आवश्यक होता. व्हर्जिनिया वसाहतीचा प्रतिनिधी रिचर्ड हेन्री ली याने काँटिनेंटल काँग्रेसमध्ये मांडलेला निर्भेळ स्वातंत्र्याचा ठराव २ जुलै १७७६ रोजी मान्य झाला. या ठरावावर चर्चा चालू असताच स्वातंत्र्याचा जाहीरनामा तयार करण्यासाठी टॉमस जेफर्सन, बेंजामिन फ्रँक्लिन, जॉन अॅडम्स, रॉजर शेर्मन व रॉबर्ट लिव्हिंगस्टन या सभासदांची नियुक्ती झाली; परंतु जाहीरनाम्याची भाषा व भावना ह्या दोहोंचाही जेफरसन हाच मुख्य शिल्पकार होता. त्यात काही दुरुस्त्या करून काँग्रेसने तो सर्वानुमते स्वीकारला.
ह्या जाहीरनाम्यात ब्रिटनने व विशेषतः तिसऱ्या जॉर्जने वसाहतींवर केलेल्या अन्यायांची यादी दिली आहे. वसाहतींची स्वातंत्र्याची मागणी निसर्गसिद्ध असल्याच्या तात्विक प्रतिपादनास त्यात प्राधान्य दिले आहे. जन्मतः व निसर्गतः सर्व माणसे सारखी असतात, हा सिद्धांत यात ठासून मांडला आहे. काही ईश्वरदत्त अधिकारांपासून माणूस वंचित राहू शकत नाही, या सूत्राच्या स्पष्टीकरणार्थ या जाहीरनाम्यात जीवितविषयक अधिकारांची परिगणना केली असून तिला सुखाकांक्षेच्या पूर्तीची पुस्ती जोडली आहे. सरकार ही संस्था मनुष्यनिर्मित असल्याने उन्मार्गगामी सरकार बदलून नवे सरकार अस्तित्वात आणण्याचा मानवाचा अधिकार वादातीत आहे, असा या अधिकाराचा गौरव या जाहीरनाम्याने केला आहे.

या जाहीरनाम्यावर लॉक, रूसो प्रभृती यूरोपीय तत्त्ववेत्यांच्या विचारसरणीचा व टॉमस पेनचा प्रभाव पडलेला स्पष्टपणे दिसून येतो. याच्या स्वीकृतीमुळे ब्रिटनशी तडजोड अशक्य झाली, वसाहतींना अन्य देशांची मदत मिळणे सुलभ झाले व अमेरिकेचे स्वातंत्र्य दृष्टिपथात आले. अमेरिका स्वतंत्र होऊन आता दोनशे वर्षे होत आली. या काळात निरनिराळ्या देशांतील अन्यायी राजवटींविरुद्ध झालेल्या संघर्षात मानवी गटांच्या प्रयत्नांना तात्विक बैठक मिळाली ती या जाहीरनाम्यातील विचारांची; हे अमेरिकेतील निग्रोंच्या हक्कांची चळवळ, अनेक देशांचे पारतंत्र्यातून विमोचन व अनेक देशांतील साम्राज्यशाहीविरुद्धचे संघर्ष इत्यादींवरून दिसते. फ्रेंच क्रांतिकारकांनी स्वीकृत केलेली मानवी हक्कांची सूची व निरनिराळ्या देशांच्या संविधानांत ग्रथित झालेले नागरिकांचे मूलभूत हक्क याच जाहीरनाम्यावर आधारलेले आहेत. त्यामुळे ‘मानवी इतिहासाला कलाटणी देणारी आधुनिक काळातील क्रांतिकारक घोषणा’ असा या जाहीरनाम्याचा गौरव होतो तो यथार्थच वाटतो. २४४ वर्षांपूर्वी मयभूमीतील सरकारचे अधिपत्य झुगारण्याचा निर्णय अमेरिकन ब्रिटिशांनी अंमलात आणला व तेव्हापासूनची आपली प्रगतीची वाटचाल केवळ स्वबळावर केली.

भारतात जून १७७५७मध्ये प्लासीची लढाई होऊन ब्रिटिश कंपनीची राजवट प्रस्थापित झाली, हे गृहित धरले तर त्याच्या नऊ वर्षे आगोदर अमेरिका ब्रिटिशांच्या जोखडातून मुक्त झाली होती. भारताला हे साखळदंड तोडण्यास आणखी १९० वर्षे झुंजावे लागले होते. भारत व अमेरिकेच्या आजच्या प्रगतीची तुलना करणाऱ्यांनी हे ध्यानात घ्यायला हवे. २४४ वर्षांत अमेरिकेने कायमच अध्यक्षीय राज्यपद्धती राबवली व भांडवलदारी अर्थव्यवस्था स्वीकारली. दोन महायुद्धांमुळे अमेरिकेचा प्रभाव वाढतच गेला.

अमेरिकन राजवटीने कधी क्युबा, कधी व्हिएतनाम तर कधी कुवैतचे युद्ध जगावर लागले. ९०च्या दशकात सोव्हिएट युनियन व अन्य कम्युनिस्ट देशांचे विघटन होऊ लागल्यावर तर अमेरिकेने जणु जागतिक पोलिसांची भूमिका घेतली.

संजीव वेलणकर, पुणे
९४२२३०१७३३

आजचे हवामान
ताज्या बातम्या