संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 01 February 2023

कुलधरा: एका रात्रीत रिकामे झालेले शापित गाव…

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

राजस्थानमध्ये असे एक गाव आहे जिथे सूर्यास्तानंतर थांबण्याची कोणी हिंमत करत नाही. ज्या लोकांनी या गावात सूर्यास्तानंतर येऊन राहण्याचा प्रयत्न केला त्या सगळ्यांना आसपास कुणीतरी असल्याचे, लहान मुले धावत गेल्याचे, बायकांच्या बोलण्याचे आवाज ऐकू यायचे भास झाले. या गावात गेल्या २०० वर्षांपासून एकही माणूस राहत नाही. या गावातील सगळे गावकरी रातोरात कुठेतरी गायब झाले आणि ते नेमके गेले कुठे हे कोणालाच माहीत नाही. ही गोष्ट आहे २०० वर्षांपूर्वीची… राजस्थानमधील एका शापित गावाची…ही गोष्ट आहे कुलधराची…

कुलधरा आणि आसपासच्या ८५ गावांतील सगळे गावकरी एका रात्रीत अचानक गायब झाले. सगळी गावं ओस पडली आणि मागे राहिला तो एक शाप- ‘या गावात जो कोणी राहायचा प्रयत्न करेल त्याचा मृत्यू अटळ आहे.’ या शापानंतर गेल्या २५० वर्षांपासून आजवर या गावात कोणीही वस्ती करूच शकले नाहीत. पण २०० वर्षांपूर्वी नेमके असे काय घडले की सगळे गावच्या गाव रिकामे झाले? रातोरात हे हजारो गावकरी गायब कुठे झाले? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं कुलधराच्या कहाण्यांमध्ये लपली आहेत.
जैसलमेरपासून १८ किमीवर असणाऱ्या कुलधरा गावात एकेकाळी श्रीमंत पालीवाल ब्राह्मण राहत होते. या गावच्या सरपंचाच्या मुलीच्या सौंदर्यांची सगळ्या राज्यात चर्चा होती. या राज्याचा क्रूर सुभेदार सालेम सिंग याची नजर एकदा या सौंदर्यवतीवर पडली आणि त्या मुलीशी लग्न करण्याची मागणी त्याने केली. पालीवालांना मात्र हे लग्न मान्य नव्हते. त्यांनी आपली नापसंती व्यक्त केली पण नकार ऐकण्याची सवय नसलेला सालेम सिंग जास्तच भडकला. ‘उद्या भल्या पहाटे मी वरात घेऊन येईन आणि वाजत गाजत या मुलीला वाड्यावर बायको बनवून घेऊन जाईन’ अशी धमकीच त्याने पालीवालांना दिली. आपल्या मुलीचे आयुष्य उध्वस्त होण्यापासून वाचवण्यासाठी कुलधरा आणि आसपासच्या ८४ गावांतील पालीवाल एकत्र आले आणि त्यांनी सूर्य उगवण्यापूर्वी गाव सोडण्याचा निर्णय घेतला. पैसे, दागिने, भांडी,कपडे सगळं काही त्यांनी मागे सोडले आणि जीव वाचवण्यासाठी आपले घर सोडून ते पळाले. दुसऱ्या दिवशी सालेम सिंग वरात घेऊन आला खरा पण त्याचे स्वागत कुलधराच्या ओसाड घरांनी केले. हा अपमान सहन न झालेल्या
सालेम सिंगने आपल्या सैनिकांना पाठवून या पालीवालांना शोधून काढायला सांगितले. पण आश्चर्य म्हणजे हे पालीवाल सैनिकांना कुठेच सापडले नाहीत. हे लोक इतक्या कमी वेळात कुठे गायब झाले हे कोडं आजही सुटलेलं नाही.
पालीवाल जरी कुलधरा सोडून गेले असले तरी त्यांचा शाप मात्र कायम आहे. त्यामुळेच कदाचित आजही कुलधरामध्ये पाऊल टाकताना पालीवालांचे अदृश्य अस्तित्व लोकांना जाणवत राहते.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Close Bitnami banner
Bitnami