न्यूयॉर्क – डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात रिपब्लिकन पक्षाकडून राष्ट्राध्यक्षपदाची निवडणुकीसाठी नामांकन भरलेले भारतीय वंशाचे विवेक रामास्वामी नव्या वादात सापडले आहेत. गेल्या वर्षी अमेरिकेतील त्यांच्या घरी घेण्यात आलेल्या मुलाखतीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यांनी अनवाणी पायाने ही मुलाखत दिल्याने सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. त्यांची ही कृती “असभ्य” आणि “अमेरिका विरोधी” असल्याची टीका काही जणांनी केली आहे.
एका युजरने म्हटले होते की, विवेक हे कधीही ओहायोचा गव्हर्नर होणार नाहीत. हे अमेरिकेला अस्वीकार्ह आहे.” दुसऱ्या युजरने लिहिले आहे की, पृथ्वीवरील सर्वात शक्तिशाली साम्राज्याच्या पदासाठी मुलाखत देताना तुम्ही किमान सॉक्स घालायला हवे होते. आणखी एका युजरने अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे की, अनवाणी विवेक शिक्षणाबद्दल आपल्याला व्याख्यान देत आहेत.
काहींनी रामास्वामीचा बचाव करत म्हटले की, दक्षिण आणि पूर्व आशियासह अनेक देशांमध्ये घरात चप्पल काढून वावरणे ही एक सामान्य पद्धत आहे. जवळजवळ सर्व भारतीय त्यांच्या घरात अनवाणी राहतात. यात काहीही चूक नाही. हा त्यांच्या संस्कृतीचा भाग आहे. ते आदर आणि स्वच्छतेचे प्रतीक मानले जाते. यामुळे बाहेरून घाण आणि जंतू घरात येत नाहीत.
मुलाखतकार इयान माइल्स चेओंग यांनी हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर रामास्वामींची बाजू घेतली आहे. त्यांनी रामास्वामी यांच्यावरील टीका “सर्वात मूर्ख युक्तिवाद” आणि “घरात अनवाणी चालणे हे अजिबात अमेरिका विरोधी नाही,” असे म्हटले आहे.