Rafale M Fighter Jet Deal : नौदलाची ताकद वाढणार! भारताचा फ्रान्ससोबत 63 हजार कोटींचा करार, ‘राफेल एम’ विमाने ताफ्यात दाखल होणार

India France Rafale M Deal

India France Rafale M Deal | पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमध्ये तणाव निर्माण झाला आहे. एकीकडे सीमवेर तणावाची स्थिती असताना भारताने मोठा संरक्षण करार केला आहे. भारताने फ्रान्ससोबत तब्बल 63हजार कोटी रुपयांचा संरक्षण करार केला आहे.

या करारानुसार, भारतीय नौदलासाठी 26 राफेल एम (Rafale M) लढाऊ विमाने खरेदी केली जाणार आहेत. या ऐतिहासिक सरकारी स्तरावरील करारामुळे भारताची सागरी सुरक्षा अधिक मजबूत होणार आहे.

खरेदी करारात 22 सिंगल-सीटर आणि 4 दोन आसनी प्रशिक्षक विमानांचा समावेश आहे. या विमानांची डिलिव्हरी 2031 पर्यंत सर्व विमानांची डिलिव्हरी पूर्ण होईल. या करारात विमानांची देखभाल, आवश्यक लॉजिस्टिकल सपोर्ट आणि भारतीय नौदलाच्या वैमानिकांचे प्रशिक्षण यांचाही समावेश आहे.

महत्त्वाचे म्हणजे, या करारात ‘आत्मनिर्भर भारत’उपक्रमाला चालना देण्यासाठी विमानांच्या काही सुट्या भागांचे भारतातच उत्पादन केले जाणार आहे.

राफेल एम हे जगातील सर्वात प्रगत नौदल लढाऊ विमानांपैकी एक मानले जाते. सध्या केवळ फ्रान्सच्या नौदलाकडे ही विमाने आहेत. ही विमाने विमानवाहू जहाजांवर उतरण्यासाठी खास तयार करण्यात आली आहेत. यात मजबूत लँडिंग गिअर, फोल्डिंग विंग्ज आणि डेक लँडिंगचा सामना करण्यासाठी विशेष अंडरकॅरेज आहे.

भारतीय नौदलाची ही नवीन शस्त्रे INS विक्रांत आणि INS विक्रमादित्य या विमानवाहू जहाजांवर तैनात केली जातील, ज्यामुळे हिंदी महासागरातील भारताची ताकद वाढेल आणि कोणत्याही धोक्याचा प्रभावीपणे सामना करता येईल.

राफेल एम विमाने नौदलाच्या ताफ्यातील जुन्या मिग-29के (MiG-29K) विमानांची जागा घेणार आहेत. यापूर्वीच भारतीय हवाई दलाकडे (Indian Air Force) 36 राफेल विमाने कार्यरत आहेत. आता नौदल प्रकारांच्या समावेशामुळे हवाई दलाच्या क्षमतांमध्येही वाढ होणार आहे.

भारतीय नौदल स्वदेशी बनावटीची पाचव्या पिढीतील लढाऊ विमाने ( देखील ताफ्यात सामील करण्याच्या तयारीत आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेद्वारे (DRDO) ही विमाने विकसित केली जात आहेत. ही ट्विन-इंजिन, डेक-आधारित लढाऊ विमाने हवाई दलासाठी तयार होत असलेल्या ॲडव्हान्स्ड मीडियम कॉम्बॅट एअरक्राफ्ट (AMCA) ची नौदल आवृत्ती असेल.

भारतीय हवाई दलाची 36 राफेल विमाने (‘सी’ प्रकार) उत्तर भारतातील दोन हवाई तळांवरून कार्यरत आहेत. आता राफेल एम च्या समावेशामुळे भारताची संरक्षण सिद्धता अधिक मजबूत झाली आहे.