Vaibhav Suryavanshi : वैभवशाली विक्रम! 14 वर्षीय सूर्यवंशीने अवघ्या 35 चेंडूत ठोकले शतक, मोडले अनेक विक्रम

Vaibhav Suryavanshi IPL Record

Vaibhav Suryavanshi IPL Record | राजस्थान रॉयल्सच्या (Rajasthan Royals) 14 वर्षीय युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीने (Vaibhav Suryavanshi) गुजरात टायटन्सविरुद्धच्या (Gujarat Titans) सामन्यात आयपीएलच्या (IPL) इतिहासात अनेक विक्रम मोडीत काढले.

वैभव सूर्यवंशी केवळ 35 चेंडूत शतक झळकावत भारतीय फलंदाजांमध्ये सर्वात जलद शतक करणारा खेळाडू ठरला आहे. याआधीचा विक्रम युसूफ पठाणच्या नावावर होता, ज्याने 2010 मध्ये 37 चेंडूत शतक केले होते. एकंदरीत, हे आयपीएलमधील दुसरे सर्वात जलद शतक आहे. ख्रिस गेलने 2013 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुकडून पुणे वॉरियर्सविरुद्ध 30 चेंडूत शतक ठोकले होते.

वैभव सूर्यवंशीने 14 वर्षे 32 दिवसांच्या वयात शतक ठोकत मनीष पांडेचाविक्रमही मागे टाकला आहे. पांडेने 2009 मध्ये 19 वर्षे 253 दिवसांच्या वयात शतक केले होते. त्याचबरोबर, टी20 क्रिकेटमध्ये (T20 Cricket) सर्वात कमी वयात शतक करणारा खेळाडू होण्याचा जागतिक विक्रमही वैभवने आपल्या नावावर केला आहे. याआधी हा विक्रम विजय झोलच्या (Vijay Zol) नावावर होता.

राजस्थानच्या डावात चौथ्या षटकात वैभवने अनुभवी गोलंदाज इशांत शर्माला फटकेबाजी करत 28 धावा वसूल केल्या. त्यानंतर पदार्पण करणाऱ्या करीम जनातच्या एका षटकात तब्बल 30 धावा घेतल्या. अखेर तो 38 चेंडूत 101 धावा करून प्रसिद्ध कृष्णाच्या गोलंदाजीवर बाद झाला.

दरम्यान, या सामन्यात गुजरात टायटन्सने शुभमन गिलच्या (Shubman Gill) 84 धावांच्या खेळीच्या जोरावर 4 बाद 209 धावा केल्या होत्या. गिलने सलामीवीर साई सुदर्शनसोबत 93 धावांची भागीदारी केली. जोस बटलरने देखील फटकेबाजी करत नाबाद 50 धावा केल्या. तर धावांचा पाठलाग करताना राजस्थानने अवघ्या 15.5 षटकात 2 विकेट्स गमावत 212 धावा करत विजय मिळवला.

वैभव सूर्यवंशी कोण आहे?

बिहारमधील समस्तीपूरचा रहिवासी असलेल्या वैभवला 2024 च्या IPL लिलावात राजस्थान रॉयल्सने त्याला तब्बल 1.1 कोटी रुपयांना विकत घेतले होते. गतवर्षी त्याने केवळ 13 व्या वर्षी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. त्याच वर्षी सप्टेंबरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या (Australia) युवा कसोटी सामन्यात त्याने केवळ 58 चेंडूत शानदार शतक झळकावले होते, ज्यामुळे निवड समितीचे लक्ष त्याच्याकडे वेधले गेले.

2024 च्या आशिया कपमध्ये (Asia Cup 2024) त्याने श्रीलंकेविरुद्ध (Sri Lanka) 104 धावांचे शतक झळकावले होते. संपूर्ण स्पर्धेत त्याने 44 च्या सरासरीने 176 धावा केल्या होत्या. याशिवाय, रणधीर वर्मा अंडर-19 टूर्नामेंटमध्ये त्याने नाबाद 332 धावा करत त्रिशतक ठोकले होते,ज्यामुळे तो लहान वयात चर्चेचा विषय ठरला.

IPL 2025 च्या सुरुवातीला तो बेंचवर होता, पण संजू सॅमसनच्या दुखापतीमुळे त्याला अंतिम 11 मध्ये संधी मिळाली आणि त्याने ती संधी दोन्ही हातांनी लुटली.