Padma Awards Ceremony: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्म पुरस्कारांचे वितरण; महाराष्ट्रातील 9 मान्यवरांचा गौरव

Padma Awards Ceremony : देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार असलेल्या ‘पद्म पुरस्कारां’चा (Padma Awards 2025) वितरण समारंभ सोमवारी (28 एप्रिल) राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Droupadi Murmu) यांच्या हस्ते नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनातील दरबार हॉलमध्ये संपन्न झाला.

या वर्षी 76 व्या प्रजासत्ताक दिनाच्या (Republic Day 2025) पूर्वसंध्येला जाहीर करण्यात आलेल्या 139 पद्म पुरस्कारांपैकी पहिल्या टप्प्यात 71 जणांना सन्मानित करण्यात आले. यामध्ये 4 जणांना पद्मविभूषण, 10 जणांना पद्मभूषण आणि 57 जणांना पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आले. पहिल्या टप्प्यात 71 जणांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर या पुरस्कार वितरणाचा दुसरा टप्पा पुढील महिन्यात होणार असून, उर्वरित 68 जणांना त्यावेळी सन्मानित करण्यात येणार आहे.

या पुरस्कार समारंभावेळी उपराष्ट्रपती जगदीप धनखड (Vice President Jagdeep Dhankhar), पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Union Home Minister Amit Shah) यांची प्रमुख उपस्थिती होती.

ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक शेखर कपूर, गझल गायक पंकज उधास (मरणोत्तर), आणि माजी बिहार उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांना पद्मभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले. तसेच भारतीय हॉकीपटू पी.आर. श्रीजेश, तमिळ अभिनेता एस. अजित कुमार, झायडस लाइफसायन्सेसचे चेअरमन पंकज पटेल आणि ‘फादर ऑफ पेंटियम’ म्हणून प्रसिद्ध असलेले भारतीय-अमेरिकन अभियंता विनोद धाम यांनाही पद्मभूषण देण्यात आला. या समारंभात दिवंगत ओसामु सुझुकी (सुझुकी मोटर कॉर्पोरेशनचे माजी प्रमुख) यांनाही पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

महाराष्ट्रातून नऊ मान्यवरांचा विशेष सन्मान करण्यात आला. यामध्ये अरुंधती भट्टाचार्य, पवनकुमार गोयंका, जस्पिंदर नरुला, रानेद्र भानू मजुमदार, वासुदेव कामत, चैत्राम पवार आणि मारुती चित्तमपल्ली यांचा समावेश आहे.

अरुंधती भट्टाचार्य, सध्या सेल्सफोर्स इंडियाच्या चेअरपर्सन आणि सीईओ आहेत. भारतीय स्टेट बँकेतडिजिटल परिवर्तन घडवून आणण्याचे त्यांचे महत्त्वाचे योगदान आहे. पवनकुमार गोयंका, माजी महिंद्रा अँड महिंद्राचे व्यवस्थापकीय संचालक, यांनी ऑटोमोटिव्ह आणि शेती उपकरणे व्यवसायात मोठी कामगिरी केली आहे.

सोलापूरचे सुपुत्र व ‘अरण्यऋषी’ म्हणून ओळखले जाणारे मारुती चित्तमपल्ली यांना वन्यजीव अभ्यास आणि साहित्य क्षेत्रातील योगदानासाठी पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले. सुप्रसिद्ध चित्रकार वासुदेव कामत , बांसुरी वादक रानेद्र भानू मजुमदार, गायक जसपिंदर नरुला, आणि पर्यावरण रक्षणासाठी कार्यरत असलेले चैत्राम पवार यांनाही पद्मश्री पुरस्काराने गौरवले गेले.

यंदा विशेषतः 30 ‘अज्ञात हिरों’ची (Unsung Heroes) नोंद घेण्यात आली असून, त्यात गोव्याच्या स्वातंत्र्य चळवळीतील महत्त्वपूर्ण योगदान दिलेल्या 100 वर्षीय लिबिया लोबो सरदेसाई यांचा समावेश आहे.