Neha Singh Rathore : पहलगाम हल्ल्यावरील वादग्रस्त टिप्पणी भोवली, यूट्यूबर नेहा सिंह राठोडविरुद्ध तक्रार दाखल

FIR Against Neha Singh Rathore

FIR Against Neha Singh Rathore | काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) संपूर्ण देशात संताप व्यक्त केला जात आहे. काहीजण पाकिस्तानविरोधात संताप व्यक्त करत आहेत, तर काहीजण सरकारला सुरक्षेच्या त्रुटीवरून जबाबदार धरत आहे. यातच प्रसिद्ध यूट्यूबर नेहा सिंह राठोडने पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केलेल्या वक्तव्यामुळे तिच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

नेहा सिंह राठोडने पहलगाममधील दहशतवादी हल्ला सरकारची चूक असल्याचा आरोप करत सोशल मीडियावर तीव्र शब्दांत सरकारवर टीका केली. तसेच तिने या घटनेचा राजकीय वापर बिहार निवडणुकीसाठी होईल, असा दावा केला. तिच्या या वक्तव्याचे पाकिस्तानमध्ये स्वागत झाले असून, सोशल मीडियावर त्यांच्या विधानांचा भारताविरुद्ध हत्यार म्हणून वापर केला जात असल्याचा आरोप आहे.

लखनऊच्या हजरतगंज पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या एफआयआर (FIR Against Neha Singh) नुसार, नेहा सिंह राठोडने तिच्या ट्विटर हँडलवरूनअनेक आक्षेपार्ह पोस्ट केल्या. या पोस्टमधून राष्ट्रीय एकात्मतेवर प्रतिकूल परिणाम घडवण्याचा प्रयत्न झाला आणि समुदायांमध्ये तेढ निर्माण करण्याचा आरोप आहे. कवी अभय प्रताप सिंह उर्फ अभय सिंह निर्भीक यांनी ही तक्रार नोंदवली आहे.

एफआयआरमध्ये नमूद आहे की नेहा सिंहचे ट्विट पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले असून, तेथील मीडियाने त्यांच्या विधानांचा भारतविरोधात प्रचार केला आहे. नेहा सिंह राठोड विरुद्ध भारतीय दंड संहितेच्या 196(1)(a), 196(1)(b), 197(1)(a), 197(1)(b), 197(1)(c), 197(1)(d), 353(1)(c), 353(2), 302, 152 कलमांखाली आणि आयटी ॲक्ट 69A अंतर्गत तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरू केला आहे.

दरम्यान, पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याने देशभरात संतापाची लाट उसळली आहे. पाकिस्तानविरोधात तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे. विरोधकांनी सरकारला पाठिंबा देत कठोर कारवाईची मागणी केली आहे, तर काही वर्ग सरकारच्या धोरणांवर प्रश्न उपस्थित करत आहेत.

Share:

More Posts