Pakistan Airspace Closure : पाकिस्तानच्या हवाई क्षेत्र बंदीचा भारतीय प्रवासी आणि विमान कंपन्यांवर काय परिणाम होणार?

Pakistan Airspace Closure

Pahalgam Terror Attack | पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानने भारतीय विमान कंपन्यांसाठी हवाई क्षेत्र बंद केले आहे. या हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला आहे. पाकिस्तानने भारतीय विमान कंपन्यांसाठी आपले हवाई क्षेत्र (Pakistan Airspace Closure) बंद केल्याची अधिकृत घोषणा केली. परिणामी, भारतीय आंतरराष्ट्रीय उड्डाणांचा कालावधी वाढणार असून, त्याचा थेट परिणाम उड्डाण खर्च आणि परिचालन खर्च (operating cost) यावर होणार आहे.

गेल्या 6 वर्षांतील ही पहिलीच वेळ आहे, जेव्हा पाकिस्तानने हवाई क्षेत्रावर निर्बंध टाकले आहेत. यापूर्वी 2019 मध्ये भारतीय हवाई दलाच्या बालाकोट हल्ल्यानंतर, पाकिस्तानने सुमारे 5 महिन्यांसाठी अशा प्रकारची बंदी लागू केली होती.

या बंदीमुळे, दिल्ली आणि उत्तर भारतातील शहरांमधून प्रस्थान करणाऱ्या विमानांना आता लांबचा वळसा घ्यावा लागणार आहे. Air India आणि IndiGo या कंपन्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, त्यांच्या आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर या निर्णयाचा परिणाम होणार आहे.

कुठल्या विमान कंपन्यांवर परिणाम?

Air India Express, SpiceJet, आणि Akasa Air या कंपन्यांनाही या बंदीचा फटका बसणार आहे. या सर्व कंपन्यांना आता अरबी समुद्रावरून वळसा घालून पर्यायी मार्ग स्वीकारावे लागणार आहेत, असे वरिष्ठ वैमानिकांनी PTI ला सांगितले.

भारतीय प्रवाशांवर काय परिणाम होणार?

या बंदीमुळे भारतात नोंदणीकृत सर्व विमाने आणि भारतीय ऑपरेटरच्या मालकीच्या अथवा भाडे तत्वावरील विमानांना पाकिस्तानचे हवाई क्षेत्र वापरण्यास बंदी असेल. परिणामी, अमेरिका व युरोप जाणाऱ्या विमानांच्या उड्डाण वेळेत 2 ते 2.5 तासांपर्यंत वाढ होऊ शकते, असा अंदाज वरिष्ठ वैमानिकांनी वर्तवला आहे.

विमान कंपन्यांनी अद्याप पर्यायी मार्ग सादर केले नसल्यामुळे अंतिम परिणाम स्पष्ट नाही. मात्र, अनेक मार्गांचा विचार सुरू असल्याची माहिती एअर ट्रॅफिक कंट्रोलरच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.

उड्डाण खर्चात आणि तिकीट दरात वाढ?

विमान कंपन्यांना आता जास्त इंधन बाळगावे लागेल, ज्यामुळे पेलोडवर मर्यादा येतील. अधिक इंधन घेतल्याने विमानाचे वजन वाढेल आणि त्यामुळे काही प्रवासी किंवा सामान वगळावे लागू शकते.

पर्यटन उद्योगातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने PTI ला सांगितले की, या निर्बंधांमुळे आंतरराष्ट्रीय विमान भाडे 8 ते 12 टक्क्यांपर्यंत वाढू शकते. जर ही परिस्थिती दीर्घकाळ चालू राहिली, तर तिकीट दरात अधिक वाढ होण्याची शक्यता आहे.

फेब्रुवारी 2019 मध्ये पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने केलेल्या हवाई कारवाईच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने अशाच प्रकारे आपले हवाई क्षेत्र बंद केले होते. ही बंदी अनेक महिन्यांपर्यंत होती आणि त्याचा मोठा परिणाम भारतीय विमान वाहतूक सेवांवर झाला होता.