MP Naresh Mhaske | पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी (Pahalgam Terrorist Attack) हल्ल्यात 26 भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण देशभरात शोक आणि संतापाची लाट उसळली आहे. या हल्ल्यात महाराष्ट्रातील अनेक पर्यटक काश्मीरमध्ये अडकले होते. त्यांना सुखरूप परत आणण्यासाठी महायुती सरकारने प्रयत्न सुरू केले.
या घटनेनंतर, शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी एक वादग्रस्त विधान केले आहे. त्यांनी म्हटले की, “जे लोक कधी विमानात बसले नाहीत, त्यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विमानात बसवून घरी पाठवले.” त्यांच्या या विधानामुळे तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
पत्रकारांशी बोलताना नरेश म्हस्के म्हणाले की, वर्धा -नागपूरचे 45 लोकं रेल्वेने काश्मीरला गेले होते. त्यांची अतिशय वाईट परिस्थिती होती. ते आयुष्यात कधीही विमानातही बसले नव्हते. त्या सर्वांना विमानाने परत आणण्याची व्यवस्था मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. गरिब लोकं, खाण्याचा प्रॉब्लेम होता. त्या लोकांना पहिल्यांदाच विमानात बसवून आणले’, त्यांच्या या वक्तव्यावरून आता टीका होत आहे.
ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी म्हस्केंच्या विधानावर सडकून टीका केली आहे. त्यांनी म्हटले की, “देश दुःखात असताना सत्ताधाऱ्यांनी भान ठेवले पाहिजे. कुरघोड्यांच्या राजकारणात व्यस्त असलेले हे लोक, यांचा सत्तेचा उन्माद इतका आहे की, त्या सत्तेच्या उन्मादापुढे लोकांच्या भावना संवेदना यांना काही वाटत नाही, त्यामुळे सत्ताधाऱ्यांकडून काय अपेक्षा करायच्या? जी माणसं कधीच विमानात बसली नाहीत, त्यांना विमानात बसवून उपकार केले का तुम्ही? त्यांनी तुम्हाला निवडून आणलेलं आहे याचं भान ठेवा, तुम्ही मदत केली म्हणजे तुमचं कामच आहे.”
दरम्यान, पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर, कश्मीरमध्ये पर्यटनासाठी गेलेल्या राज्यातील पर्यटकांना धीर देण्याबरोबरच तेथून त्यांना सुखरूप परत आणण्यासाठी महायुती सरकारच्या नेत्यांत स्पर्धा लागल्याचे पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री गिरीश महाजन यांना तातडीने श्रीनगरला पाठवले असतानाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कश्मीर दौऱ्यावर रवाना झाले होते.