डिजिटल पेमेंटच्या जगात नवा बदल; नेटबँकिंग व्यवहार आणखी सुलभ होणार, NPCI ची नवीन योजना

नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची (NPCI) उपकंपनी NPCI भारत बिलपे लिमिटेडने (NBBL) नेटबँकिंग व्यवहार अधिक सुलभ, सुसंगत आणि मोबाइल पेमेंटप्रमाणे इंटरऑपरेबल बनवण्यासाठी ‘नेटबँकिंग 2.0’ हा पायलट प्रकल्प सुरू केला आहे.

या उपक्रमांतर्गत, बँका NBBL च्या केंद्रीकृत प्लॅटफॉर्मशी जोडल्या जातील आणि IMPS (Immediate Payment Service) तंत्रज्ञानाचा उपयोग करून थेट नेटबँकिंग व्यवहार सक्षम करतील.

या पायलटमध्ये देशातील आघाडीच्या 10 खासगी व सरकारी बँका सहभागी आहेत.NBBL ने याच पायलट अंतर्गत 5 ते 6 पेमेंट एग्रीगेटर्ससोबत देखील समन्वय सुरू केला आहे.

UPI पलीकडे पेमेंट्सचा विस्तार NPCI चे IMPS, RTGS आणि NEFT हे सर्व चॅनेल अ‍ॅग्नॉस्टिक पेमेंट सिस्टीम्स असले तरी, UPI केवळ मोबाईल चॅनेलवर मर्यादित आहे. त्यामुळे IMPS ला लोकप्रिय करण्याच्या उद्देशाने NBBL ला नेटबँकिंगसाठी एक इंटरऑपरेबल प्लॅटफॉर्म तयार करण्याची संधी देण्यात आली आहे, जिथे UPI किंवा कार्डशिवायही व्यवहार शक्य होणार आहेत.

या नव्या प्रणालीद्वारे ग्राहकांना त्यांच्या बँकेच्या मोबाईल अ‍ॅपवर रीडायरेक्ट करून UPIसारखा सहज अनुभव दिला जाणार आहे. तसेच, व्यवहार अधिक सोपे करण्यासाठी QR कोड वापरण्याचाही विचार आहे.

नेटबँकिंग 2.0 चे वैशिष्ट्य आणि उद्दिष्ट

  • NPCI अंतर्गत एक सेंट्रलाइज्ड प्लॅटफॉर्म उभारला जात आहे, ज्या माध्यमातून व्यापारी सर्व बँकांशी सहजपणे कनेक्ट होऊ शकतील.
  • ग्राहक आता बँक-विशिष्ट मर्यादांशिवाय कोणत्याही बँकेमार्फत नेटबँकिंग वापरू शकतील.
  • पायलट टप्प्यात 10 प्रमुख बँकांचा समावेश आहे आणि पेमेंट प्रणालीत वैविध्य निर्माण करून UPI आणि कार्ड व्यवहारांवरील अवलंबित्व कमी करणे हे उद्दिष्ट आहे.
  • IMPS तंत्रज्ञानावर आधारित असूनदेखील, एक नवीन पेमेंट स्विच तयार करण्यात येणार आहे, जो काही महिन्यांत पूर्णपणे सुरू होईल.
  • विमा प्रीमियम, कर भरणा यांसारख्या उच्च मूल्याच्या व्यवहारांसाठी नेटबँकिंग अधिक विश्वसनीय पर्याय ठरणार आहे.
  • NBBL हे संपूर्ण प्रकल्प आणि पेमेंट एग्रीगेटर्ससोबत समन्वयाचे व्यवस्थापन करत आहे.
  • UPIवरचा ताण कमी करत नेटबँकिंग व्यवहारांना नवे परिमाण देणे हा एकूण उद्देश आहे.