सिंधू पाणी वाटप करार आहे तरी काय? भारताने बंदी घातल्याने पाकिस्तानावर काय परिणाम होणार? वाचा

Pahalgam Terror Attack | काश्मीरमधील पहलगामच्या बैसारन खोऱ्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 लोकांचा बळी गेल्यानंतर भारत सरकारने कठोर भूमिका घेतली आहे. बुधवारी पार पडलेल्या कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटीच्या (CCS) बैठकीत, 1960 मध्ये झालेल्या सिंधू जल कराराला (Indus Waters Treaty) तात्काळ स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

हा करार रद्द अथवा स्थगित केल्यास पाकिस्तानसाठी हे मोठं संकट ठरू शकतं, कारण देशातील बहुतांश शेती, पिण्याचं पाणी, आणि जलविद्युत प्रकल्प हे सिंधू आणि तिच्या उपनद्यांवर अवलंबून आहेत.

सिंधू जल करार: एक ऐतिहासिक पार्श्वभूमी

भारत आणि पाकिस्तान यांच्यात फाळणीनंतर लगेचच पाण्यावरून वाद सुरू झाला होता. 1948 मध्ये भारताने सिंधूच्या प्रवाहात अडथळा आणल्याने पाकिस्तानमध्ये पाण्याची टंचाई निर्माण झाली होती.या प्रश्नाच्या समाधानासाठी जागतिक बँकेच्या मध्यस्थीने 10 वर्षे चर्चा चालली.

अखेर, 19 सप्टेंबर 1960 रोजी भारताचे पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू आणि पाकिस्तानचे राष्ट्रपती अयूब खान यांनी रावळपिंडी येथे या ऐतिहासिक करारावर स्वाक्षऱ्या केल्या.

नद्यांचं वाटप कसं केलं?

या करारानुसार भारत आणि पाकिस्तान यांच्यात एकूण 6 नद्यांचं वाटप करण्यात आलं:भारताला पूर्वेकडील 3 नद्या – रावी, बियास आणि सतलज यांचा पूर्ण अधिकार मिळाला.

पाकिस्तानला पश्चिमेकडील 3 नद्या – सिंधू, झेलम आणि चिनाब यांचे पाणी अडथळ्याविना देण्याची भारताची जबाबदारी निश्चित झाली. भारत या पश्चिम नद्यांच्या पाण्याचा मर्यादित वापर वीज निर्मिती आणि सिंचनासाठी करू शकतो, परंतु प्रवाह रोखू शकत नाही.

भारताच्या वाट्याचं पाणी किती?

या कराराअंतर्गत भारताला एकूण पाण्याच्या फक्त 19.5% वापराचा अधिकार मिळतो. म्हणजे, दरवर्षी सुमारे 33 मिलियन एकर फूट (MAF) पाणी भारताला, आणि उरलेलं सुमारे 135 MAF पाणी पाकिस्तानला वापरण्याचा अधिकार आहे. भारत फक्त आपल्या वाट्याचं 90% पाणीच वापरतो, तर पाकिस्तान संपूर्ण सिंधू प्रणालीवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे.

पाकिस्तानसाठी किती महत्त्वाचा आहे हा करार?

पाकिस्तानच्या एकूण 80% शेतीयोग्य जमिनीसाठी सिंधू नदी प्रणाली अत्यावश्यक आहे. देशाच्या 93% सिंचनासाठी हेच पाणी वापरलं जातं. सुमारे 237 दशलक्ष लोकसंख्या, विशेषतः सिंधू खोऱ्यातील 61% जनता याच पाण्यावर अवलंबून आहे. कराची, लाहोर, मुलतान यांसारखी मोठी शहरे याच नद्यांवर आधारित आहेत. तरबेला, मंगला यांसारखे ऊर्जा प्रकल्प सिंधूवर उभे आहेत.