काश्मीरच्या पहलगाममध्ये पर्यटकांवर हल्ला! 27 मृत्यू!महाराष्ट्राचे दोघे ठार! नाव-धर्म विचारून गोळीबार

श्रीनगर- काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील पहलगामच्या बैसरन खोऱ्यात दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या भीषण हल्ल्यात 27 जणांचा मृत्यू झाला. तर 20 जण जखमी झाले आहेत. मृतांची संख्या वाढण्याची भीती आहे. पाच ते सहा दहशतवाद्यांनी पर्यटकांना त्यांची नावे आणि धर्म विचारून त्यांच्यावर गोळीबार केला. महाराष्ट्रातील दिलीप डिसले व अतुल मोने या दोन पर्यटकांचा मृत्यू झाला आहे.
मोने हे डोंबिवलीचे रहिवासी असून ते परळ रेल्वे वर्कशॉपमध्ये सहाय्यक अभियंता होते. राज्यातील इतरही काही जण जखमी झाले आहेत. घटनास्थळावर असलेल्या प्रगती जगदाळे या मुलीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी दूरध्वनीवरुन संपर्क साधला आणि तिच्या वडिलांना व काकांना गोळ्या घालण्यात आल्या आहेत, असे तिने सांगितले. दरम्यान अकोल्यातून गेलेले 16 पर्यटक सुखरुप आहेत. द रेझिस्टन्स फ्रंट (टीआरएफ) या संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी दहशतवादी संघटनेने स्वीकारली आहे. या हल्ल्याचे गांभीर्य लक्षात घेऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तातडीने श्रीनगरला पोहोचून उच्चस्तरिय बैठक घेतली.
हा हल्ला पहलगामच्या बैसरन व्हॅलीमध्ये घडला. या निसर्गसुंदर परिसर मिनी स्वित्झर्लंड म्हणून ओळखला जातो. हा परिसर जंगलात असून इथे फक्त पायी जाता येते. त्यासाठी अर्धा तास चालावे लागते. हल्ला घडला तेव्हा या परिसरात 3 ते 4 हजार पर्यटक होते. अनेकजण कुटुंबासह आले होते. ते या पर्वतरांगांमध्ये पर्यटक ट्रेकिंगचा आनंद लुटत होते. काही पर्यटक इथल्या फूड स्टॉलवर उभे होते. काही जण घोडेस्वारी करत होते. दुपारी दीड वाजताच्या सुमारास चारी बाजूंनी लष्करी वेशात दहशतवादी आले. त्यांनी पर्यटकांना त्यांचे नाव आणि धर्म विचारून गोळीबार करायला सुरुवात केली. पर्यटकांना सुरुवातीला फटाके वाजत आहेत, असे वाटले. परंतु दहशतवाद्यांचा हल्ला झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी पळायला सुरुवात केली. काही मिनिटे दहशतवाद्यांचा गोळीबार सुरू होता. त्यानंतर दहशतवादी जंगलात पळून गेले. हल्ल्यानंतरचे दृश्य हृदयद्रावक होते. पर्यटकांचे मृतदेह जमिनीवर पडलेले होते. काही पर्यटक जखमी झाले होते. एक महिला आपल्या नवऱ्याला वाचवा, अशी मदत मागत होती. मात्र, सगळे जण आपला जीव वाचवण्यासाठी पळत होते. काही वेळाने सुरक्षा दलांनी तिथे पोहोचून परिसराला वेढा घातला. जखमी पर्यटकांना रुग्णवाहिकेमधून रुग्णालयात नेण्यात आले. इतर पर्यटकांना सुरक्षा दलांनी बाहेर काढले.
मृतांमध्ये महाराष्ट्रातील काही जण असल्याचे सांगितले जात आहे. राजस्थान व कर्नाटकामधील एकाचा मृत्यू झाला आहे. दोन भारतीय वंशाच्या विदेशी नागरिकांचाही मृत्यू झाल्याचीही माहिती आहे. एका महिलेने सांगितले की, तिचा पती मुस्लीम नसल्याने दहशतवाद्यांनी त्याला अत्यंत जवळून गोळी घातली.
दहशतवाद्यांनी अत्यंत नियोजनपूर्वक हा हल्ला केला. मार्च महिन्यात झालेल्या हिमवृष्टीनंतर पहलगाममध्ये पर्यटकांची वर्दळ वाढली होती. शिवाय हे ठिकाण अतिशय दुर्गम भागात आहे. इथे सुरक्षारक्षक तैनात नसतात. शिवाय हा भाग जंगलाने वेढलेला असल्याने दहशतवाद्यांना इथे सहज लपता आणि पळून जाता येते.या हल्ल्याची जबाबदारी घेणारी द रेझिस्टन्स फ्रंट ही लष्करे तौयबाचीच एक शाखा आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सौदी अरेबियात आहेत. हा हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना सोडणार नाही, त्यांचा कुटील हेतू सफल होणार नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी एक्स पोस्ट करून दिली. गृहमंत्री अमित शहा तातडीने श्रीनगरला पोहोचले. त्यांनी तिथे लगेच उच्चस्तरीय बैठक घेतली. शहा यांनी 6 ते 8 एप्रिल दरम्यान जम्मू आणि काश्मीरचा दौरा केला होता. दरम्यान, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांच्याशी बोलून परिस्थितीची माहिती घेतली. या हल्ल्यानंतर बजरंग दल कार्यकर्त्यांनी जम्मूमध्ये निदर्शने केली.