BCCI Annual Contract | भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आपल्या वार्षिक खेळाडू करार यादीची (BCCI Annual Contract Players) घोषणा केली. यंदाच्या यादीत एकूण 34 खेळाडूंना स्थान देण्यात आले असून, त्यांना चार वेगवेगळ्या श्रेणींमध्ये विभागण्यात आले आहे. भारताचे कसोटी आणि एकदिवसीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी यंदाही ‘A+’ श्रेणीत आपले स्थान कायम राखले आहे.
या वर्षी विशेष लक्षवेधी बाब म्हणजे, मागील हंगामात करारातून वगळले गेलेले श्रेयस अय्यर आणि इशान किशन यांनी पुन्हा यादीत पुनरागमन केले आहे. अय्यरला ‘B’ गटात, तर इशान किशनला ‘C’ गटात स्थान मिळाले आहे.
‘A’ श्रेणीत रवींद्र जडेजा आणि जसप्रीत बुमराह यांचा समावेश असून, ते मागील काही वर्षांपासून या यादीत सातत्याने स्थान टिकवून आहेत. ‘A’ गटात यंदा ऋषभ पंतचेही पुनरागमन झाले असून, तो यापूर्वी ‘B’ गटात होता. ऋषभ पंत गेल्या वर्षीच्या भीषण अपघातानंतर पुनरागमन करत आहे.
🚨 𝗡𝗘𝗪𝗦 🚨
— BCCI (@BCCI) April 21, 2025
BCCI announces annual player retainership 2024-25 – Team India (Senior Men)#TeamIndia
Details 🔽https://t.co/lMjl2Ici3P pic.twitter.com/CsJHaLSeho
नवीन करार मिळवणारे किंवा श्रेणी वाढलेले खेळाडू:
- ऋषभ पंत – ‘B’ वरून ‘A’ गटात बढती
- श्रेयस अय्यर – ‘B’ गटात पुनरागमन
- इशान किशन – ‘C’ गटात पुनरागमन
करार यादीतून वगळलेले खेळाडू:
- शार्दुल ठाकूर
- जितेश शर्मा
- के. एस. भरत
- आवेश खान
या वर्षी ‘C’ गटात सर्वाधिक 19 खेळाडूंना स्थान देण्यात आले आहे. यामध्ये अनेक नवीन चेहऱ्यांचा समावेश आहे, ज्यांना पहिल्यांदाच BCCI कडून अधिकृत वार्षिक करार मिळाला आहे सरफराज खान, नितीश रेड्डी, अभिषेक शर्मा, आकाश दीप, वरुण चक्रवर्ती, हर्षित राणा यांचा नव्याने ‘C’ गटात समावेश करण्यात आला आहे.
भारतीय क्रिकेटमध्ये सातत्य, फिटनेस आणि देशांतर्गत क्रिकेटमधील योगदान हाच करारामधील स्थानाचा मुख्य निकष असल्याचे बीसीसीआयने याआधी स्पष्ट केले होते.