Scientists Found New Colour OLO : वैज्ञानिकांनी असा एक नवा रंग (new color) शोधल्याचा दावा केला आहे, जो मानवी इतिहासात यापूर्वी कुणीही कधीच पाहिलेला नाही. या रंगाला ‘ओलो’ असे नाव देण्यात आले आहे. हा रंग पाहण्याचा अनुभव अविश्वसनीय आणि मेंदूसाठी अनोखा असल्याचे संशोधक म्हणतात.
‘सायन्स ॲडव्हान्सेस’ (Science Advances) या वैज्ञानिक नियतकालिकात 18 एप्रिल रोजी हे संशोधन प्रकाशित झाले. अवघ्या 5 लोकांनी ‘ओलो’ प्रत्यक्ष पाहिलेला असून त्यांनी त्याचे वर्णन मोराच्या निळसर किंवा हिरवट निळ्या (greenish-blue) छटेसारखे, पण अधिक तीव्रतेने उजळलेले असे केले आहे.
कसा अनुभवता येतो ‘ओलो’?
संशोधनासाठी वैज्ञानिकांनी स्वयंसेवकांच्या डोळ्यांमध्ये विशिष्ट लेझर (laser) पल्स वापरून एक प्रत्यक्ष प्रयोग केला. कॅलिफोर्निया विद्यापीठ (University of California) बर्कले येथील इलेक्ट्रिकल इंजिनियर रेन एनजी (Ren Ng) यांनी सांगितले, “आम्ही कल्पना केली होती की काहीतरी नवीन दिसेल, पण मेंदू त्यावर कशी प्रतिक्रिया देईल हे अज्ञात होते. जेव्हा आम्ही तो रंग पाहिला, तेव्हा आम्ही थक्क झालो.”
हा रंग केवळ लेझरच्या मदतीने रेटिनावर अत्यंत सूक्ष्म पद्धतीने उद्दीपित केल्यावरच अनुभवता येतो. त्यामुळे तो कोणत्याही मोबाइल स्क्रिनवर, टीव्हीवर किंवा व्हीआर डिव्हाइसमध्ये दाखवता येणार नाही, असे वैज्ञानिक स्पष्टपणे म्हणाले.
मानवी डोळ्यांची मर्यादा ओलांडली
आपल्या डोळ्यांतील रंग-संवेदनक्षम पेशी (cones) मुख्यतः तीन प्रकारांच्या तरंगलांबींसाठी काम करतात – लांब (L), मध्यम (M) आणि लहान (S). मात्र, नैसर्गिक प्रकाश M पेशींना स्वतंत्रपणे उद्दीपित करू शकत नाही. हाच मुद्दा ओळखून वैज्ञानिकांनी M पेशींवर थेट प्रकाश टाकून हा रंग निर्माण केला. हा रंग सामान्य जीवनात पाहणे शक्य आहे का, असे विचारले असता संशोधकांनी स्पष्टपणे नकार दिला.