Pune cab services Cost | पुणे, पिंपरी-चिंचवड आणि बारामती शहरांमध्ये ओला (Ola), उबर (Uber) आणि रॅपिडो (Rapido) सारख्या अॅप-आधारित (app-based) कॅब सेवांसाठी राज्य सरकारने निश्चित केलेले दर आता लागू होणार आहेत. हे दर ऑटो रिक्षा प्रमाणेच राहतील आणि 1 मे 2025 पासून अंमलबजावणी होणार आहे.
सरकारमान्य दर लागू केल्याने आता ग्राहकांना कॅब सेवेसाठी जास्त पैसे खर्च करावे लागणार आहेत.
इंडियन गिग वर्कर्स फ्रंटचे अध्यक्ष केशव क्षीरसागर यांनी सांगितले की, कॅब चालकांच्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब झाला. नवीन दरानुसार, पहिल्या 1.5 किलोमीटरसाठी 37 रुपये आकारले जातील आणि त्यानंतर प्रत्येक किलोमीटरसाठी 25 रुपये भाडे लागेल.
उदाहरणार्थ, 10 किलोमीटर प्रवासासाठी ग्राहकांना आता किमान 249.50 रुपये मोजावे लागतील, जे सध्याच्या सरासरी नॉन-सर्ज फेरपेक्षा अधिक आहेत.
भाडेप्रणालीमध्ये पारदर्शकता राखण्यासाठी www.onlymeter.in ही खास वेबसाइट सुरु होणार असून, प्रत्येक कॅबमध्ये एक QR कोड असेल. प्रवाशांनी त्यात प्रवासाचे अंतर टाकल्यास सरकारमान्य दरानुसार नेमके किती पैसे द्यायचे हे ते पाहू शकतील.
1 मेपासून नवीन दर लागू होतील, मात्र त्याआधी जनजागृतीसाठी मोहिम राबवली जाईल, असं क्षीरसागर यांनी स्पष्ट केलं. सध्या पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये सुमारे 45,000 अॅप-आधारित कॅब्स (cab services) कार्यरत आहेत.