IPL मध्ये सर्वात कमी वयात डेब्यू करणारा वैभव सूर्यवंशी कोण आहे? पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकत केले पदार्पण

Vaibhav Suryavanshi IPL Debut

Vaibhav Suryavanshi IPL Debut | 14 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने (Vaibhav Suryavanshi) आयपीएल (IPL 2025) मध्ये राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) कडून पदार्पण करताच इतिहास घडवला. लखनऊ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) विरुद्धच्या सामन्यात फलंदाजीसाठी उतरलेला वैभव IPL च्या इतिहासातील सर्वात कमी वयाचा पदार्पण करणारा खेळाडू ठरला आहे.

विशेष म्हणजे, त्याने पहिल्याच चेंडूवर भारताचा अनुभवी गोलंदाज शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) याला षटकार ठोकून प्रेक्षकांची मने जिंकली.

सूर्यवंशीने लखनऊविरुद्ध केवळ 20 चेंडूत 34 धावा केल्या. त्याच्या खेळीत 3 षटकार आणि 2 चौकारांचा समावेश होता. अर्धशतक उंबरठ्यावर असताना एडन मार्करमने (Aiden Markram) त्याला बाद केले.

वैभव सूर्यवंशी कोण आहे?

बिहारमधील समस्तीपूरचा रहिवासी असलेल्या वैभवला 2024 च्या IPL लिलावात राजस्थान रॉयल्सने त्याला तब्बल 1.1 कोटी रुपयांना विकत घेतले होते. गतवर्षी त्याने केवळ 13 व्या वर्षी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. त्याच वर्षी सप्टेंबरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या (Australia) युवा कसोटी सामन्यात त्याने केवळ 58 चेंडूत शानदार शतक झळकावले होते, ज्यामुळे निवड समितीचे लक्ष त्याच्याकडे वेधले गेले.

2024 च्या आशिया कपमध्ये (Asia Cup 2024) त्याने श्रीलंकेविरुद्ध (Sri Lanka) 104 धावांचे शतक झळकावले होते. संपूर्ण स्पर्धेत त्याने 44 च्या सरासरीने 176 धावा केल्या होत्या. याशिवाय, रणधीर वर्मा अंडर-19 टूर्नामेंटमध्ये त्याने नाबाद 332 धावा करत त्रिशतक ठोकले होते,ज्यामुळे तो लहान वयात चर्चेचा विषय ठरला.

IPL 2025 च्या सुरुवातीला तो बेंचवर होता, पण संजू सॅमसनच्या दुखापतीमुळे त्याला अंतिम 11 मध्ये संधी मिळाली आणि त्याने ती संधी दोन्ही हातांनी लुटली. यशस्वी जैस्वालसोबत सलामीला उतरलेला सूर्यवंशी पहिल्या चेंडूपासूनच आक्रमक पवित्रा घेत मैदान गाजवत गेला.

दरम्यान, या सामन्यात राजस्थानला लखनऊकडून 2 धावांना पराभव स्विकारावा लागला. लखनऊने पहिल्यांदा फलंदाजी करत 20 षटकात 5 गडी गमावत 180 धावा केल्या. तर धावांचा पाठलाग करताना राजस्थानचा संघ 20 षटकात 5 गडी गमावत केवळ 178 धावांपर्यंत मजल मारू शकला.