जपान भारताला देणार दोन मोफत बुलेट ट्रेन

मुंबई- जपान देश भारताला दोन शिंकानसेन ट्रेन म्हणजेच बुलेट ट्रेन भेट देणार आहे. त्यांचा वापर मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरच्या निरीक्षणासाठी केला जाणार आहे. इ ५, इ ६ या मॉडेलच्या या दोन ट्रेन भारतात २०२६ पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.सध्या भारतातील बुलेट ट्रेनच्या प्रकल्पाचे काम वेगाने सुरू आहे.

३२० किमी प्रति तास वेग असलेल्या या दोन ट्रेनमुळे भारतीय अभियंत्यांना शिंकानसेन बुलेट ट्रेनचे तंत्रज्ञान समजून घेण्यास मदत होणार आहे. २०३० च्या सुरुवातीला मुंबई-अहमदाबाद दरम्यान इ१० शिंकानसेन ट्रेन चालविण्याचा भारत व जपानचा विचार आहे.या रेल्वेमार्गाचा सूरत ते बिलीमोरा यादरम्यानचा पहिला टप्पा ऑगस्ट २०२६ मध्ये सुरू होण्याची अपेक्षा आहे. तो ४८ किमीचा आहे. उर्वरित भाग सर्व काम पूर्ण झाल्यानंतर सुरू केला जाईल, असे जपान टाइम्स या वृत्तपत्रातील बातमीत म्हटले आहे.गुजरातमध्ये ओव्हरहेड इक्विपमेंट (ओएचई) मास्ट लावण्याचे कामही सुरू आहे.हे मास्ट विद्युततारा धरून ठेवतात. सूरत आणि बिलीमोरा बुलेट ट्रेन स्टेशनदरम्यान २ किलोमीटरपर्यंत स्टीलचे मास्ट लावले गेले आहेत