चेंबूरमध्ये जलवाहिनी फुटली २४ तास पाणीपुरवठा बंद

मुंबई – चेंबूरमध्ये मेट्रो रेल्वेचे काम सुरू असताना अमर महल जंक्शन येथे १२०० मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीला धक्का बसल्याने आज पहाटे जलवाहिनी फुटली. त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले. त्यामुळे चेंबूर, शिवाजी नगर, मानखुर्द, घाटकोपर, कुर्ला, सायन, वडाळा आणि परळ या भागांतील पाणीपुरवठा खंडीत झाला.
जलवाहिनी फुटल्याचा फटका केईएम, टाटा, वाडिया यांसारख्या महत्त्वाच्या रुग्णालयांनाही बसला आहे. घाटकोपर (पूर्व-पश्चिम), गोवंडी, मानखुर्द, शिवाजीनगर, वडाळा, दादर आदी परिसराचा पाणीपुरवठा शनिवार सकाळी ११ ते रविवार २० एप्रिल सकाळी ११ वाजेपर्यंत २४ तासांसाठी बंद ठेवण्यात आला आहे. महापालिकेने दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू केले असून, काम पूर्ण झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने पाणीपुरवठा सुरळीत केला जाणार आहे. या काळात नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा असे आवाहन महापालिकेने केले आहे.