Samruddhi Expressway | मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाचा अखेरचा 76 किमीचा टप्पा – इगतपुरी ते ठाण्यातील अमाने हा मार्ग – लवकरच वाहतुकीसाठी खुला होणार आहे. महाराष्ट्र दिनी म्हणजेच 1 मे रोजी या टप्प्याचं उद्घाटन होण्याची शक्यता आहे. या दिवशीच ठाणे क्रीक ब्रिजच्या दक्षिणमार्गी रस्त्याचंही उद्घाटन होणार आहे.
या दोन्ही महत्त्वाच्या प्रकल्पांचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारनं दिला आहे. मोदी हे त्या दिवशी मुंबईतील बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये होणाऱ्या वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अॅण्ड एंटरटेन्मेंट समिटला उपस्थित राहणार असल्यामुळे, त्यांच्या हस्ते या प्रकल्पांचं लोकार्पण करण्याचा विचार आहे.
“दोन्ही प्रकल्प उद्घाटनासाठी पूर्णतः तयार आहेत. एकदा हे मार्ग खुले झाले की, नवी मुंबई, पुणे आणि आगामी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाशी कनेक्टिव्हिटी लक्षणीयरीत्या वाढेल,” असं महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे (MSRDC) व्यवस्थापकीय संचालक अनिल गायकवाड यांनी सांगितले.
फडणवीसांचा ड्रीम प्रोजेक्ट आता पूर्णत्वास
समृद्धी महामार्ग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2014-19 दरम्यान हाती घेतलेला महत्त्वाकांक्षी प्रकल्प होता. काम 2019 मध्ये सुरू झालं, मात्र कोरोनामुळे ते थोडं लांबलं. त्यानंतर कामाला पुन्हा गती मिळाली आणि आता अखेरचा टप्पाही पूर्ण झालाय.
हा महामार्ग उभारण्यासाठी 8,861 हेक्टर जमिनीचे अधिग्रहण करण्यात आले. एकूण 16 बांधकाम कंपन्यांनी वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये हे काम पूर्ण केलं.
टप्प्याटप्प्याने वाहतुकीसाठी खुला
डिसेंबर 2022 मध्ये पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन झालं. त्यानंतर मे 2023 मध्ये तत्कालिन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिर्डी ते भारविर (नाशिक) टप्पा सुरू केला. त्याच वर्षी भारविर ते इगतपुरी (25 किमी) हा टप्पाही खुला करण्यात आला.
आता अखेरचा टप्पा पूर्ण झाल्यानं संपूर्ण समृद्धी महामार्ग लवकरच पूर्ण क्षमतेने सुरू होणार आहे. हा महामार्ग नागपूर, वर्धा, अमरावती, वाशिम, बुलढाणा, जालना, औरंगाबाद, नाशिक, अहमदनगर आणि ठाणे या 10 जिल्ह्यांमधून जाणार आहे. महामार्गावर सुमारे 50 उड्डाणपूल, 5 बोगदे, 300 वाहनांसाठी अंडरपास, आणि 400 पादचारी अंडरपास असतील.